पुणे : भारताच्या फाळणीचा विषय अस्तित्वात नव्हता, तेव्हापासूनच महात्मा गांधींच्या हत्येचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे हत्येबाबत निव्वळ अपप्रचार केला जात आहे. नथुराम गोडसे हा केवळ आज्ञेचे पालन करणारा व्यक्ती होता, राष्ट्रीय संघटन पाठीशी असल्याशिवाय हे कृत्य करता येणे शक्य नाही. बापूंच्या हत्येनंतर नेमण्यात आलेल्या कपूर समितीचा अहवाल प्रसिद्धच होऊ न दिल्यामुळे, हत्येमागचे खरे रहस्य उघडकीस आले नसल्याचा दावा महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केला. हिंदू राष्ट्राची उभारणी करणे हेच संघाचे स्वप्न होते, गांधींची हत्या हे त्याचे पहिले पाऊल होते; मात्र ६० वर्षांत त्यांच्या हिंदूराष्ट्रनिर्मितीचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, देश वाचला, आपण वाचलो, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी या वेळी केली. जयवंत मठकर अमृतमहोत्सव समिती, चांगले विचार समूह, सर्वोदय मंडळ यांच्या वतीने ‘गांधीहत्या सत्य आणि असत्य’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे उपस्थित होते. संकेत मुनोत लिखित ‘एक धैर्यशील योद्धा गांधी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. गांधी म्हणाले की, बापूंच्या हत्येचा पहिला प्रयत्न पुण्यात झाला होता तो १९३४ साली. नंतर पुण्यातील हल्ल्यात वापरलेल्या हातगोळ्यांचा संबंध नगर येथे एका मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्याशी होता आणि दोन्ही प्रकरणातील आरोपी एक होता, हा योगायोग नाही. पुण्यात गांधींना चप्पल-बुटांची भेट पाठविणारा, वर्धा येथे गांधींची गाडी नादुरुस्त करणारा आणि हत्या करणारा आरोपी एकच म्हणजे नथुराम होता. यातून त्याच्या मागे एक संघटना होती आणि हा पूर्वनियोजित कट होता हे स्पष्ट दिसते. पोलिसांनी याबाबत कधीच सतर्कता बाळगली नाही. त्यांची भूमिका संशयास्पद होती, असा आरोप गांधी यांनी केला.गांधींच्या हत्येनंतर गावा-गावांत संघाने मिठाई कशी वाटली, ही सगळी तयारी कोणी केली होती, अशी घणाघाती टीका गांधी यांनी केली. बापूंच्या हत्येनंतर नेमलेल्या कपूर समितीची सर्व कागदपत्रे उघड झाली तर ढोंगी राष्ट्रभक्तांची कुटनीती स्पष्ट होईल, असे सांगत मुस्लिमांचे राजकारण, फाळणी व ५५ कोटी याचे खापर केवळ गांधींवर फोडण्यात येते, याबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत हल्ला चढवला. (प्रतिनिधी)
गांधी हत्येचे सत्य गुलदस्तातच
By admin | Published: November 07, 2016 1:32 AM