- जयंत धुळप, अलिबागमहाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून लोकांचे संरक्षण विधेयक सरकारने मंजूर केले आणि आता हा कायदा अमलात येईल, याचे खरे श्रेय या कुप्रथेचा जाच वर्षानुवर्षे सहन करणाऱ्या आणि अन्यायाविरोधात लढणाऱ्या शेकडो वाळीतग्रस्तांचेच आहे. न्यायासाठी त्या प्रक्रियेची चक्रे फिरवणाऱ्यांचे ते श्रेय असते आणि येथे ही चक्रे फिरवणारे वाळीतग्रस्तच आहेत, अशी स्पष्ट प्रतिक्रिया या कायद्याचे प्रारूप तयार करणारे मानवी हक्क क्षेत्रातील अॅड. असीम सरोदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.संतोष जाधव सामाजिक बहिष्कार प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, खंडपीठाने सामाजिक बहिष्कार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याबाबत राज्याच्या पोलीस विभागास दिलेल्या मार्गदर्शक सूचना व त्यांची तत्काळ अंमबजावणी हा या कायदा निर्मिती प्रक्रियेतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि सकारात्मक पहिला टप्पा ठरला आणि वाळीतग्रस्तांना मोठा आशेचा किरण सर्वप्रथम दिसला. त्यातून वाळीतग्रस्त पोलीस ठाण्यात येऊन तक्रारी दाखल करू लागले, असे अॅड. सरोदे यांनी सांगितले.या कायदा निर्मितीच्या महत्त्वाच्या प्रक्रियेचा विचार करून या कायद्याचे प्रारूप तयार केले. ते शासन आणि विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता सामाजिक कार्यकर्त्या प्रिया खान यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी कायद्याचे प्रारूप सादर करण्याची संधी दिली, असेही अॅड. सरोदे यांनी नमूद केले.
‘कायद्याचे खरे नायक वाळीतग्रस्तच’
By admin | Published: April 15, 2016 2:12 AM