प्राची सोनवणे,
नवी मुंबई- अमेरिकेच्या ४५ व्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी सुरु झालेल्या सोहळ्यात मुंबईतील नृत्य दिग्दर्शक आणि कलाकारांचा विशेष सहभाग घेतला. या सोहळ्यात सादर केलेल्या बॉलीवूड नृत्याचे दिग्दर्शन नालासोपारा येथील नृत्य दिग्दर्शक सुरेश मुकुंद यांनी केले असून ७ मिनिटांच्या या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. भारतीय आणि परदेशी नर्तकांना एकत्रितरीत्या, एकाच व्यासपीठावर नृत्याविष्कार सादर करायला लावण्याचे आव्हान नृत्यदिग्दर्शकाने उत्कृष्ट पार पाडले, अशा शब्दांमध्ये नृत्यदिग्दर्शक सुरेश मुकुंदचे विशेष कौतुक करण्यात आले. काही तांत्रिक अडचणींमुळे कार्यक्रमात काही गाणी अगदी वेळेवर बदलण्यात आली. याची पूर्वकल्पनाही या नृत्यातील कोणत्याही कलाकाराला नव्हती तरीदेखील न घाबरता, न डगमगता ठेका धरत नृत्याविष्कार सादर केला. यामध्ये आर्या डान्स अकादमीचे कलाकार सहभागी झाले होते. बॉलीवूडमधील जय हो, काला चश्मा, मुंड्या तू बच के रही, पॉप लेची पोरा गाण्यांवर उपस्थितांना थिरकण्यास भाग पाडले. यामध्ये गायक मिका सिंह यांचाही समावेश होता. >शशांकचा अभिमाननवी मुंबईतील शशांक माळी या तरुणाचाही या नृत्याच्या संघामध्ये समावेश होता. नवी मुंबईतील तरुणाने नृत्याच्या माध्यमातून भारताचा झेंडा रोवल्याची प्रतिक्रिया शशांकचे वडील पांडुरंग माळी यांनी व्यक्त केली. ‘लोकमत’शी बोलताना माळी यांनी या भारतीय नृत्य संघाचे कौतुक केले. यावेळी तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे घरबसल्या मला बॉलीवूड नृत्य पाहता आले. या संपूर्ण नृत्यात फडकणारा तिरंगा पाहून देशाचा अभिमान वाटत असल्याचेही माळी यांनी सांगितले.