वााशिम : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्याबाबत दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आल्यानंतर रिक्त जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने २२ जून रोजी निवडणूक कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार अकोला व वाशिम जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या रिक्त जागांसाठी १९ जुलै रोजी मतदान होणार आहे.वाशिम जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जानेवारी २०२० मध्ये झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विकास गवळी यांच्यासह अन्य काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आल्या. सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्चला आरक्षणासंदर्भातील याचिका निकाली काढत, ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून दोन आठवड्यांत पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला. न्यायालयाच्या या निकालानुसार, ओबीसी प्रवर्गातील वाशिम जिल्हा परिषदेचे १४ व पंचायत समितीच्या २७ सदस्यांची पदे रिक्त झाली. दरम्यान, यासंदर्भात राज्य शासनासह एकूण ११ पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीअंती ४ मे २०२१ रोजी सर्व ११ पुनर्विचार (पुनर्विलोकन) याचिका व त्यासोबतचे सर्व स्थगिती मागणारे अर्ज फेटाळल्याने रिक्त जागांसाठी निवडणूक अटळ होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार वाशिम जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २७ गणांसाठी १९ जुलै रोजी मतदान आणि २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
असा राहिल निवडणूक कार्यक्रम
- निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करणे २९ जून
- नामनिर्देशनपत्र सादर करणे २९ जून ते ५ जुलै
- नामनिर्देशनपत्राची छाननी व त्यावर निर्णय देणे ६ जुलै
- वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे ६ जुलै
- नामनिर्देशन पत्राबाबत अपिल करण्याची अंतिम मुदत ९ जुलै
- अपिलावर सुनावणी व निकाल १२ जुलै
- नामनिर्देशनपत्र मागे घेणे १२ जुलै
- उमेदवारांची यादी व निशाणी वाटप १२ जुलै
- मतदान १९ जुलै
- मतमोजणी २० जुलै