अहमदनगर - गर्भलिंग निदान वक्तव्याप्रकरणी अडचणीत आलेले कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात भूमाता ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या चार दिवसात इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला नाही तर अकोला येथे जाऊन त्यांना महिला कार्यकर्त्या काळे फासतील असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.
याबाबत बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, येत्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना इंदोरीकर महाराजांबाबत जाब विचारला जाईल. इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करावा या संदर्भात भूमाता ब्रिगेडकडून मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
दरम्यान, खुद्द इंदोरीकर महाराजांनी माफी मागणारे पत्रक मंगळवारी प्रसिद्ध केले आहे. मी जे काही बोललो आहे, ते माझ्या अभ्यासानुसार बोलले आहे. माध्यमांनी त्याचा विपर्यास केला आहे. तरीही वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
इंदोरीकरांनी जाहीर केलेल्या माफीपत्रात म्हटलंय की, मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून गेल्या २६ वर्षांपासून समाजप्रबोधनाचे आणि अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम करत आहे. गेल्या २६ वर्षांत मी जाचक रुढी-परंपरा दूर होण्यासाठीही अथक प्रयत्न केले. मात्र माझ्या कीर्तनरुपी सेवेतील एका वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे. माफी मागताना त्यांनी सर्व वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील आणि आई समान असलेल्या सर्व महिला वर्गांना उद्देशून हा माफीनामा जारी केला आहे.
५ फेब्रुवारीच्या कीर्तनातील निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे इंदोरीकर समर्थक आणि विरोधक यांचे अक्षरशः शाब्दिक युद्ध पेटले. याच विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही कारवाईची मागणी केली आहे. याच विषयावर देसाई यांनी इंदोरीकर यांच्या विरोधात भूमिका घेतली असून त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलही होत आहेत. या सगळ्याबद्दल तक्रार देण्यासाठी त्या नगरला निघाल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
इंदोरीकर महाराजांची एखादी चूक असती तर त्यांना माफ केलं असतं :तक्रार देण्यावर तृप्ती देसाई ठाम
मी जे काही बोललो आहे, ते माझ्या अभ्यासानुसार बोललो आहे- इंदोरीकर
इंदोरीकर महाराजांची दिलगिरी; वाचा डॉक्टर, शिक्षक, माता-भगिनींना लिहिलेलं पत्र
इंदोरीकर महाराजांंचे आवाहन : माझ्या समर्थनार्थ बंद, मोर्चे नकोत