मुंबई : शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर आणि कोल्हापूरच्या अंबाबाईनंतर आता तृप्ती देसाई यांनी मुंबईच्या हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र तृप्ती देसाई यांनी येथे गैरमार्गाने दर्ग्यात प्रवेश केल्यास त्यांना चपलांचा प्रसाद देण्यात येईल, असा इशारा शिवसेना उपनेते आणि मुस्लीम समाजाचे नेते हाजी अरफात शेख यांनी शुक्रवारी दिला.भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी २८ एप्रिल रोजी हाजीअली दर्ग्यात महिला कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. याप्रकरणी मुस्लीम समाजातून आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता हाजी अरफात शेख हेदेखील बोलते झाले आहेत. देसाई यांनी हाजीअली दर्ग्यामध्ये मजार परिसरात घुसण्याचा नाहक प्रयत्न केला तर चपलांचा प्रसाद देऊन त्यांचे स्वागत करू, असा धमकीवजा इशारा शेख यांनी दिला आहे. शेख यांच्या म्हणण्यानुसार, तृप्ती देसाई या प्रसिद्धीसाठी धार्मिक भावनांशी खेळत आहेत. धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे शरियतनुसार महिलांना दर्गाह आणि कब्रस्तानात प्रवेशाकरिता पूर्णत: मनाई आहे. (प्रतिनिधी)
तृप्ती देसाई यांना मारहाणीची धमकी
By admin | Published: April 23, 2016 3:41 AM