अहमदनगर : शनिचौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा, याबाबत ग्रामस्थ व विश्वस्तांसोबत चर्चा करण्यासाठी शनिशिंगणापूरला निघालेल्या भूमाता रणरागिणी बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासह सात महिलांना नगर पोलिसांनी केडगाव बायपास येथे रोखले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या. शनिशिंगणापूर ग्रामस्थ आणि देवस्थानचे विश्वस्त मंडळ यांच्याशी देसाई सोमवारी चर्चा करणार होत्या. दुपारी १२च्या सुमारास त्यांना नगर पोलिसांनी केडगाव बायपासजवळ रोखले. शनिशिंगणापूरला जाता येणार नाही. तेथे गेल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, तसेच तुमच्याही जीविताला धोका आहे. विश्वस्त मंडळाशी नगरला चर्चा करावी, अशी भूमिका पोलिसांनी मांडली. मात्र, त्याला देसाई यांनी नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी देसाई व त्यांच्या सहा सहकारी महिलांना ताब्यात घेत पोलिसांमार्फत प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या. त्यानंतर नगर येथील डीएसपी चौकात देसाई यांच्या वाहनाने पोलिसांना हुलकावणी देत औरंगाबाद रोडमार्गे शिंगणापूरला जाण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद रोडवरील पालिका कार्यालयासमोरच पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या वाहनातून पुणे हद्दीत रवाना केले. या गोंधळामुळे औरंगाबाद रोडवरील वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती. (प्रतिनिधी)लोकशाही मार्गाने शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करणार होते. मात्र पोलिसांनी काहीही कारण नसताना रोखले. हा लोकशाहीला कलंक आहे. याबद्दल सरकारचा निषेध करते. आंदोलनाला महिना होऊनही मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली नाही. यापुढे कोणालाही न सांगता शिंगणापूरला जाण्याचा प्रयत्न आहे. - तृप्ती देसाई, अध्यक्षा, भूमाता रणरागिणी बिग्रेड
तृप्ती देसाई यांना नगरमध्ये रोखले
By admin | Published: February 23, 2016 12:54 AM