लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - ठाणे ग्रामीण पोलीस असताना भाईंदर येथे सुरू करण्यात आलेल्या भरोसा सेलने कौटुंबिक वाद विवाद सोडवण्यात महत्वाची भूमिका पार पाडत नागरिकांचा विश्वास संपादन केला होता. पण नंतर तो बंद पडला. आता मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वर्षपूर्ती निमित्त भाईंदर येथे पुन्हा भरोसा सेल तयार केला असून सोमवार पासून लोकांचा भरोसा पुन्हा जिंकण्यासाठी पोलिसांचा भरोसा सेल सज्ज झाला आहे.
ठाणे ग्रामीण पोलीस कार्यकाळात मीरा भाईंदर साठी पोलिसांनी भरोसा सेल हा भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्याच्या गच्चीवर सुरू केला होता. त्यावेळी सहायक पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी भरोसा सेल राबवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले व नागरिकां मध्ये सुद्धा भरोसा निर्माण झाला. कौटुंबिक वादाची सुमारे ६०० प्रकरणे सेल कडे आली होती. त्यातील ८०% प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली. पोलिसांना त्यावेळी चांगले वकील, समुपदेशक, मानसोपचार तज्ञ, महिला संस्था आदींची चांगली साथ मिळाली होती. परंतु कुलकर्णी यांची बदली झाल्यावर भरोसा सेल दुर्लक्षित होऊन बंद पडला होता.
गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयचा शुभारंभ करण्यात आला होता. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली मनुष्यबळ, जागा आदींची कमतरता असून देखील अवघ्या वर्षभरात आयुक्तालयाची घडी बऱ्यापैकी बसली आहे. नवनवीन विभाग व उपक्रम पोलीस राबवत असून गुन्ह्यांच्या तपासाचे प्रमाण वाढले आहे.
भरोसा सेल सुरू करणे प्रस्तावित होते. शहराची वाढती लोकसंख्या व महिला हिंसाचार , कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या तक्रारीना प्राधान्य देणे , त्यांना समुपदेशन करून मानसिक आधार देणे व त्यांच्या तक्रारीचे निवारण करणे याकरीता पोलीस आयुक्तालय वर्धापन दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी सायंकाळी पोलीस आयुक्त दाते यांचे हस्ते भाईंदर येथील भरोसा सेलचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अपर पोलीस आयुक्त एस. जयकुमार, गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ. महेश पाटील, भरोसा सेलच्या प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे, कार्यालयासाठी पालिका निधी उपलब्ध करून देणाऱ्या नगरसेविका रिटा शाह आदी उपस्थित होते.
पोलिस आयुक्त दाते म्हणाले की, मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालय सुरु होऊन एक वर्ष झाले. या वर्षभरात अनेक उपक्रम पोलिसांनी सुरू केले. पण भरोसा सेल सुरू करणे बाकी होते. ते आज सुरू करत आहोत याचा विशेष आनंद आहे. पोलीस ठाण्यात महिला, वृद्ध तसेच मुलांच्या कौटुंबिक तक्रारी येत असतात. पण त्यावर कायदेशीर कारवाई करण्या ऐवजी त्या तक्रारी समुपदेशना द्वारे , तज्ञ, वकिलां च्या मार्गदर्शनाने सोडवाव्यात अशी तक्रारदारांची अपेक्षा असते. त्या अनुषंगाने मीरा भाईंदर साठी भरोसा सेल सोमवार पासून सुरू होईल. लवकरच वसई व विरार साठी परिमंडळ २ व ३ मध्ये सुद्धा भरोसा सेल सुरू करणार आहोत.