कोल्हापूर : सांगली पोलिसांनी केलेला प्रकार खूपच लाजिरवाणा आहे. त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. याप्रकरणी परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे या दोघांच्या बदलीची मागणी होत आहे. त्या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल. मृत अनिकेतच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. रविवारी अंबाबाई दर्शनासाठी आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.सांगली शहर पोलिसांनी अनिकेत कोथळे या संशयित आरोपीचा खून करून मृतदेह जाळल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. गृहराज्यमंत्री केसरकर रविवारी सांगलीला जाण्यापूर्वी कोल्हापुरात काही काळ थांबले होते. अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अनिकेत हत्या प्रकरणानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील व पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे या दोघांच्या बदलीची मागणी शिवसेना व इतर पक्ष व संघटनांनी केली आहे. यासंबंधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यांच्या बदलीचा निर्णय घेतला जाईल. सातारा, सांगली आणि कोल्हापुरात आरोपींना थर्ड डिग्रीचा जास्त वापर केला जातो. तसेच ‘डेथ इन कस्टडी’मध्येही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
पोलीस कोठडीत आरोपींना दिल्या जाणाऱ्या वागणुकीविषयी नियमावली ठरवण्याबरोबरच अधिकाऱ्यांनाही योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. मृत अनिकेतच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी आपला प्रयत्न राहील. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आवश्यक मदत केली जाईल.राज्यात सर्व पोलीस ठाण्यांत सीसीटीव्हीवित्त आणि नियोजन खात्याने जिल्हा नियोजन समितीतून सीसीटीव्ही खरेदीला नुकतीच परवानगी दिली आहे. त्यामुळे वर्षभरात राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. पोलिसांच्या कामावर नियंत्रण राहणार असून, कोठडीत संशयित आरोपींना कशी वागणूक दिली जाते, याची माहिती हाती पडणार आहे.