नाशिक : दुधाधारी मशिदीच्या नावाने वक्फ मंडळात नोंद असलेल्या सिडको परिसरातील ९८०/९८१मधील ५३ एकरचा भुखंड ताब्यात घेण्यासाठी विश्वस्त सरसावले आहे. या भुखंडाप्रकरणी शासनाने औरंगाबादच्या वक्फ मंडळाच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नसीमा पटेल यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई केली आहे.वक्फच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी तडकाफडकी निलंबीत करण्यात आलेल्या औरंगाबाद वक्फ मंडळाच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नसीमा पटेल यांच्या कामगिरीचे पडसाद आता शहरातून उमटत आहेत. जुने नाशिकातील दुधाधारी मशिदीच्या विश्वस्तांनी पत्रकार परिषद घेऊन पटेल यांच्यावर फौजदारीची मागणी केली आहे.सिडकोमधील कोट्यवधी रुपये किमतीच्या ५३ एकर वक्फ जमीनीवर सध्या गृहप्रकल्प उभारण्यात आल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचे विश्वस्तांनी दुधाधारी मशिदीत शनिवारी (दि.४) झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. दुधाधारी मशिदीच्या नावाने सदर भुखंड वक्फ मंडळात नोंदणीकृत असून सनदसह सर्व पुरावे आमच्याकडे आहे. याबाबत आम्ही उच्च न्यायालयात आमची बाजू मांडत असून न्यायसंस्थेवर व सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असे अब्दुल शकुर सय्यद, कुतुबुद्दीन मुल्ला, मौलाना मुफ्ती आसीफ सय्यद आदिंनी सांगितले.
नाशिकमधील वक्फचा भुखंड ताब्यात घेण्यासाठी विश्वस्त सरसावले
By admin | Published: March 04, 2017 9:02 PM