कोल्हापूर : परिवर्तनशीलता शोधण्याचा प्रयत्न करा, त्यासह चिंतन करून समाजाचे मन समजून घ्या, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांनी शुक्रवारी येथे केले.येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. महालक्ष्मी हॉलमधील या कार्यक्रमास ‘अंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, हमीद दाभोलकर उपस्थित होते. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंनिसच्या राज्य कार्यकारिणीची बैठक व अधिवेशन आयोजितकेले आहे.डॉ. भवाळकर म्हणाल्या की, आपल्या देशात विविधता आहे. जो पूजापाठ करतो तो कर्मठच असतो असे नाही. त्यामुळे याकडे ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी योग्य पद्धतीने पाहावे. समाजाचे अंतर्बाह्य परीक्षण, वाचन करावे, त्यातून बारकावे समजतील. विविध घटनांबाबत विचार आणि वाचन करून आपल्या पद्धतीने परीक्षण करून ते समाजाच्या प्रयोगशाळेत तपासून पाहावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे परिवर्तनशीलता शोधण्याचा प्रयत्न करावा. संत परंपरेतील समाजवैज्ञानिक भूमिका समजून घ्यावी. सध्याच्या स्थितीत आध्यात्मिक लोकशाही गरजेची आहे. मी आणि माझ्याभोवतीचा समाज यातील अनुबंध म्हणजे अध्यात्म असे मी मानते. आध्यात्मिक लोकशाहीद्वारे एकमेकांची मते समजून घ्यावीत. या वेळी बोलताना अविनाश पाटील म्हणाले, समविचारी पक्षांशी एकजूट करून आपली भूमिका निभावण्याची गरज आहे. राजकीय, सामाजिक पातळीवरील बदलांकडे ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी अभ्यासपूर्वक लक्ष द्यावे. कार्यक्रमास कॉ. पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांना अभिवादन करून प्रारंभ झाला. (प्रतिनिधी)हत्येमागे वैचारिक विरोधक : हमीद दाभोलकरडॉ. नरेंद्र दाभोलकर, अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास हा अत्यंत असमाधानकारक आहे. ज्या वेळी एकच हत्यार तिन्ही हत्यांमध्ये वापरले गेले हे स्पष्ट होते, त्या वेळी त्याचा एक अर्थ असा होतो की, जर दाभोलकर यांचे मारेकरी वेळीच पकडले असते तर, पुढच्या हत्या टळू शकल्या असत्या. दुसरा अर्थ असा की, या हत्येमागे कोणतीही वैयक्तिक किंवा कौटुंबिक बाब नसून त्याच्यामागे वैचारिक विरोधक आहेत, असे ‘अंनिस’चे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
परिवर्तनशीलता शोधण्याचा प्रयत्न करा : तारा भवाळकर
By admin | Published: February 20, 2016 3:06 AM