किशोर मापारीलोणार(जि. बुलडाणा), दि. ३- लोणार सरोवर व सरोवराचा परिसर शास्त्रज्ञांसाठी सर्वात उत्तम स्थळ आहे. खार्या पाण्याबरोबरच ऐतिहासिक, वैज्ञानिक व धार्मिक वारसा लोणारला लाभला असून, हा वारसा जपण्याची गरज आहे. सरोवर विकासासाठी प्रयत्न करणार असून, त्याकरिता आगामी होणार्या बजेटच्या बैठकीमध्ये सरोवर विकासाबाबत चर्चा करू, असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले.लोणार पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ३ मार्च रोजी ते बोलत होते. जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवराचे संवर्धन होण्यासाठी येथे लोणार पर्यटन महोत्सव २0१७ चे आयोजन करण्यात आले असून, ३ ते ५ मार्चदरम्यान चालणार्या या महोत्सवाचे उद्घाटन कृषी व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री बुलडाणा पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला मातृतीर्थ सिंदखेड राजावरून लोणारला महोत्सव ज्योत आणण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.प्रतापराव जाधव यांची उपस्थिती होती. कृषी व फलोत्पादन तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, की लोणार सरोवर परिसर हा खगोलशास्त्र अभ्यास करण्यासाठी जगातील सर्वात उत्तम स्थळ आहे. या ठिकाणाहून आकाशगंगेचा चांगला अभ्यास करता येऊ शकतो. खार्या पाण्यासाठी लोणार सरोवर प्रसिद्ध तर आहेच, शिवाय याठिकाणी ऐतिहासिक, वैज्ञानिक व धार्मिक वारसा मोठा आहे. तो आपण आपला समजून जोपासला गेला पाहिजे. तसेच समृद्धी मार्ग जवळून जात असल्याने त्याचाही फायदा लोणार सरोवर पर्यटन वाढीसाठी होईल, असे ना.पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे, नगराध्यक्ष भूषण मापारी, जि.प. अध्यक्ष अलका खंडारे, डॉ.विकास आमटे, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, आ. संजय रायमुलकर यांची उपस्थिती होती. प्राची धुमाळ यांनी स्वागतगीत सादर केले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या पर्यटन महोत्सवाला देश-विदेशातील पर्यटक हजेरी लावत आहेत.
सरोवर विकासासाठी प्रयत्न करणार-फुंडकर
By admin | Published: March 04, 2017 2:23 AM