अंबरनाथ : अंबरनाथमध्ये सहा जणांनी मायलेकीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील काहींनी महिलेच्या शरीरावर तीक्ष्ण हत्यारांनी गंभीर दुखापत केली आणि मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे मायलेकी भयभीत झाल्या असून या ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून गेल्या वर्षीदेखील या मायलेकीच्या बाबतीत असाच जीवघेणा प्रकार घडला होता. पुष्पांजली सिंग आणि तिची १० वर्षांची मुलगी शनिवारी रात्री घरी जात होत्या. त्याच वेळेस एक चारचाकी आणि दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी पुष्पांजलीच्या हातावर आणि गळ्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करत दुचाकीवरून मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. अपहरण केल्यानंतर माझे हातपाय बांधून अंगावर काहीतरी द्रव पदार्थ टाकून मला जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती पीडित मुलीने दिली आहे. आमचे राहते घर आणि तिथली जागा बळकावण्यासाठी आम्हाला वारंवार जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात असून, हा हल्लादेखील मागील वर्षी ज्यांनी केला आहे, त्यांनीच केल्याचा आरोप पुष्पांजली यांनी केला आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसात ६ जणांविरोधात अपहरण आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
मायलेकीला ठार मारण्याचा प्रयत्न
By admin | Published: November 30, 2015 3:12 AM