रोहा : तालुक्यातील तळाघर येथे महादेवाची यात्रा पारंपरिक पद्धतीने साजरी होत असताना या यात्रेतील एका आदिवासी समाजातील यात्रेकरूला अन्य तिघांनी गावठी दारू पाजून नंतर मोटारसायकलवरून दुसऱ्या गावात नेले. तेथे त्यांना मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याजवळील पाच हजार रुपये चोरून नेले. ही घटना बुधवारी ५ एप्रिल रोजी मध्यरात्री २.३० वाजता घडली आहे. या प्रकरणातील तिघांविरोधात चोरी करून खुनाचा प्रयत्न करणे असा गुन्हा दाखल असून आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.रोहे तालुक्यातील तळाघर येथे दरवर्षी महादेव देवाची यात्रा भरते. या यात्रेत तळाघर, लांढर, वाशी, बोरघर, धाटाव, किल्ला, कोलाड, भुवनेश्वर, वरसे आदी ग्रामीण व शहरी भागातील हजारो भक्त सामील होतात. ५ एप्रिल रोजी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी चंद्रकांत पवार (४८, रा.बाहे, ता.रोहा) हा आदिवासी समाजातील व्यक्ती यात्रेत फिरत असताना तीन अनोळखी व्यक्तींबरोबर त्यांची ओळख झाली. ओळखीनंतर फिर्यादी चंद्रकांत पवार याला त्या तिघांनी गावठी दारू पाजून मोटारसायकलवर बसवून धामणसई गावाच्या हद्दीत नेऊन मारहाण करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने खुनाचा प्रयत्न केला व त्याच्या खिशातील ५ हजार रुपये चोरून त्यास सोनगावच्या पुलावर टाकून घटनास्थळावरून पळ काढला. एखाद्या चित्रपटात शोभावा असाच प्रकार मध्यरात्री निर्मनुष्य ठिकाणी घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.या घटनेतील तीन अनोळखी मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. के.एस.नागे व राजा पाटील पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)>प्रकृती चिंताजनकफिर्यादी चंद्रकांत पवार हा सध्या गंभीर जखमी असून त्यांना तातडीने अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईत हलविण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
रोह्यात दारू पाजून खुनाचा प्रयत्न
By admin | Published: April 07, 2017 2:42 AM