काटेवाडी (जि. पुणे) : विरोधक खोटेनाटे आरोप करतात. खालच्या पातळीवर जाऊन सहानुभूती मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. प्रतिभा काकी मला आईसारख्या आहेत. पण, त्यांना टेक्स्टाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखल्याच्या बातम्या पसरवल्या जातात. विरोधक असला तरी मी त्याचे काम मार्गी लावतो. मग घरातल्यांबाबत असे होईल का, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. बारामती येथे प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते.
बारामतीकरांनी मला लोकसभेला जोरात झटका दिला, पाठीमागे मी एकटाच पडलो होतो. आता माझी आई व बहिणींसह माझे कुटुंब सोबत आहे. बारामतीकर हेच माझे कुटुंब आहे. विरोधक भावनिक करतात. त्यांना सडेतोड उत्तर द्या. कोणाला घाबरण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.
साहेब आणि मी आमच्या दोघांच्या काळात कधीही लोक पैसे देऊन आणावे लागले नाहीत. आता ५०० रुपये देऊन महिला आणल्या जात आहेत. या सवयी झेपणाऱ्या नाहीत. तुम्हाला नादच करायचा असला तर मग मी पण पुरून उरेन, असा इशाराही त्यांनी दिला.
‘अजितवर काय अन्याय झालाय, हे मला माहीत...’
बारामती : बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगता सभेला त्यांच्या मातोश्री आशाताई पवार या उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी एका पत्राद्वारे सभेत संवाद साधला. किरण गुजर यांनी पत्राचे वाचन केले.
अजित लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच सतत धडपडत असतो. त्यासाठी मनामध्ये काही न ठेवता स्पष्टपणे बोलत असतो. एक आई म्हणून माझं दुःख मलाच माहिती आहे की, अजितवर काय अन्याय झालाय आणि तो काय सोसतोय. आजही कुटुंबासाठी तो काही गोष्टी बोलत नाही. पण स्वतः मात्र सगळं सहन करतोय, असे पत्रात नमूद आहे.