ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - हिंदुस्थानने शेजारधर्माच्या बाता करीत पाकिस्तानचे वाकडे शेपूट सरळ करण्याचा प्रयत्न केला असला तरी फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्याचा हट्ट कायम राखल्याने पाकचे शेपूट वाकडेच राहणार याचा प्रत्यय आला अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पाकिस्तानवर केली आहे. तसेच हिंदुस्थान-पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांत चर्चा झालीच असती तरी संबंध सुधारले असते व ‘ऑल इज वेल’ घडले असते, या भ्रमात कोणी राहू नये. पाकिस्तानशी कोणतीही चर्चा झाली तरी त्यातून निष्पन्न काय होणार, असा प्रश्न विचारत चर्चेतून पळ काढून पाकिस्तानने त्यावर शिक्कामोर्तबच केल्याचेही उद्धव यांनी म्हह्टले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून पाकवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे.
काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी चर्चा करणे म्हणजे दोन देशांतील करार व समझोत्याचे उल्लंघन आहे, पण पाकिस्तान हा शब्दाला जागणारा देश नाही व या देशात लोकशाहीचे अस्तित्व नाही. या देशाचे ‘मालक’ दहशतवादी टोळ्या असून त्यांच्या मर्जीनुसार तो देश चालत असतो. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा करून तरी काय उपयोग असा सवालही उद्धव यांनी विचारला आहे. दोन देशांत चर्चा फक्त दहशतवादावर होईल व तिसर्या कुणालाही या चर्चेत आणायचे नाही असे ठरलेले असतानाही पाकिस्तानने काश्मीरमधील अतिरेक्यांना व फुटीरतावाद्यांना चर्चेसाठी बोलवावे हे त्यांच्या विश्वासघातकी प्रवृत्तीस साजेसेच असल्याचा टोलाही त्यांनी हाणला आहे. ‘रॉ’सह अनेक गुप्तचर संस्थांत काम केलेले भारताचे अजित डोवल यांच्या तुलनेत पाकिस्तानचे सरताज अजिज तसे कुचकामीच आहेत व डोवल यांच्यासमोर ते साफ फिकेच पडत असल्याची टीका खुद्द पाकिस्तानी माध्यमांतच चालली आहे. सरताज यांना काही विशेष अनुभव नसल्याने या बैठकीवर फक्त हिंदुस्थानचा दबदबा राहील अशीही चर्चा पाकिस्तानात सुरू झाली होती. त्यामुळेच हा चर्चेचा डाव विस्कटून जावा आणि कश्मीर प्रश्नी गोंधळ निर्माण करून पळ काढावा, अशी ‘नीती’ आखण्यात आली व त्याप्रमाणेच घडले, असे उद्धव यांनी म्हटले आहे.