मुंबई - Maratha Reservation Update ( Marathi News ) मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याच्या निर्णयावर अखेर बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झाले असून, २० फेब्रुवारीला हे अधिवेशन पार पडणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. सगेसोयरे यासंदर्भातील अधिसूचनेलाही अधिवेशनात कायद्याचे स्वरूप येण्याची शक्यता आहे.
मराठा-कुणबी आरक्षणात सगेसायऱ्यांच्या व्याख्येसंदर्भातील मसुद्याच्या अंमलबजावणीबाबत संभ्रम असल्यामुळे मनोज जरांगे-पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे राज्य सरकारविरोधात मराठा आंदोलकांचा रोष वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता राज्य सरकारकडून २० फेब्रुवारीला विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
जरांगे यांच्या नाकातून रक्तस्राव
मनाेज जरांगे यांनी वैद्यकीय उपचार घ्यावे, असे महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी म्हणाले. त्यावर जरांगेंना सलाइन लावल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. सरकारकडून उपचार स्वीकारणार का? असा सवाल करत न्यायालयाने याचे उत्तर गुरुवारी देण्याचे निर्देश जरांगे यांना दिले.