मुंबई : नवी मुंबईच्या महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे हे तूर्त कायम राहणार असल्याचे बुधवारी नगरविकास विभागाच्या आदेशानंतर स्पष्ट झाले. मुंढे यांच्या हकालपट्टीचा नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनी बहुमताने मंजूर केलेल्या ठरावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील नगरविकास विभागाने स्थगिती दिली. नवी मुंबईच्या महापौरांनी ३० दिवसांच्या आत या ठरावाबाबतची भूमिका राज्य शासनाकडे स्पष्ट करावी, असा आदेश विभागाने दिला. नवी मुंबई महापालिकेच्या ठरावानंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता होती. मुंढे हटावच्या मागणीसाठी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या नेतृत्वातील नगरसेवकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले होते. मुंढे यांना हटवावे, अशी आग्रही भूमिका भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनेने घेतलेली असल्याने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे लक्ष लागून होते. नगरविकास विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले की नवी मुंबई महापालिकेच्या या ठरावाला अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. महापालिकेची बाजू ऐकल्यानंतर शासन योग्य निर्णय घेईल. (विशेष प्रतिनिधी) >फडणवीस पाठिशीआपण मुंढे प्रकरणात गुणवत्तेवर निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. मुंढे चांगले काम करतात, अशी पावतीही त्यांनी दिली होती. त्यामुळे मुंढेंना मुख्यमंत्र्यांकडून तत्काळ हटविले जाण्याची शक्यता नव्हती. बुधवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले.
तुकाराम मुंढे आयुक्तपदी कायम
By admin | Published: November 03, 2016 6:41 AM