जिथे जातील तिथे आपली 'हवा' करणारे, कायद्यावर बोट ठेवून भल्याभल्यांना पाणी पाजणारे धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. १२ वर्षांच्या सरकारी सेवेतली ही त्यांची १२वी बदली आहे आणि आता ते नाशिक आयुक्त कार्यालयातून थेट राज्याच्या मुख्यालयात - मंत्रालयात रुजू होत आहेत. मुंढेंच्या बदलीची बातमी आली, तेव्हापासून मुख्यमंत्र्यांची त्यांच्यावरची मर्जी आटल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु, मुंढेंची मंत्रालयात नियुक्ती करून देवेंद्र फडणवीस यांनी भारीच युक्ती केल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
तुकाराम मुंढे यांच्याकडे नियोजन खात्याच्या सहसचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांचं कार्यालय मंत्रालयातच असेल. या खात्याचं मंत्रिपद सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे. मुनगंटीवार हेसुद्धा देधडक निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांची आणि मुंढेंची जोडी चांगली जमू शकते. हे गणित बांधून फडणवीसांनी त्यांना मंत्रालयात बोलावून घेतलं असावं, असा काहींचा अंदाज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मुंढेंवरचा वरदहस्त काढल्याच्या चर्चेत फारसं तथ्य नाही. उलट, त्यांनी अत्यंत चतुराईनं हे प्रकरण हाताळून सगळ्यांनाच खूष करण्याचा प्रयत्न केला आहे.
तुकाराम मुंढेंच्या कार्यपद्धतीवर नाशिकमधील भाजपा पदाधिकारी, नेते, नगरसेवक नाराज होते. त्यांनी नाशिक आयुक्तपदाची सूत्रं स्वीकारल्यापासूनच महापालिकेत खटके उडाले होते. हा वाद विकोपाला गेला होता. सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी मुंढेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणून आपला राग व्यक्त केला होता. तेव्हा, मुख्यमंत्री मुंढेंच्या पाठीशी उभे राहिले होते. त्यांनी मध्यस्थी करून भाजपा नगरसेवकांना हा प्रस्ताव मागे घ्यायला लावला होता. त्यानंतर वरवर शांतता दिसत होती, पण आत सगळेच धुमसत होते. मुंढेंची बदली करून मुख्यमंत्र्यांनी ही धुसफूस संपवली आहे. मुंढेंनी पदभार सोडल्यानंतर महापौरांच्या बंगल्याबाहेर फुटलेले फटाके तेच दर्शवतात. इथे मुख्यमंत्र्यांची अर्धी मोहीम फत्ते झाली. भाजपाचे स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी प्रसन्न झाले. तर दुसरीकडे फडणवीस यांनी मुंढेंनाही बळच दिलं.
नवी मुंबई आणि नाशिकचा अनुभव पाहता, तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांचे सूर जुळलेले नाहीत. पण, नियमावर बोट ठेवून, बेकायदेशीर कामं करणाऱ्यांना हिसका दाखवणाऱ्या मुंढेंनी नागरिकांची मनं जिंकल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळेच बहुधा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचं अनेकदा पाहायला मिळालं. अगदी आजची बदलीही मुख्यमंत्र्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने केलीय. मुंढेंना पुन्हा एखाद्या महापालिकेत किंवा स्वायत्त संस्थेत पाठवलं असतं तर तिथल्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना ते कितपत रुचलं असतं, पचलं असतं, याबद्दल शंकाच आहे. त्याऐवजी, शिस्त लावण्याचं, नियमावर बोट ठेवून कामं करून घेण्याची जबाबदारी ते नियोजन खात्यात अधिक चोख बजावू शकतात, असा विचार मुख्यमंत्र्यांनी केला असावा, याकडे राजकीय जाणकारांनी लक्ष वेधलं. त्यामुळे ही बदली मुख्यमंत्री आणि मुंढेंमधील दुरावा नव्हे, तर जवळीक वाढवणारीच ठरणार आहे.