देहूगाव : भगव्या पताका उंचावत ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा आसमंत दणाणणारा अखंड गजर, वीणेचा झंकार अन् टाळ-मृदंगाचा कल्लोळ अशा विठ्ठलभक्तीच्या तल्लीन वातावरणात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या ३३०व्या पालखी सोहळ्याने भूवैकुंठ अर्थात पंढरीकडे बुधवारी सायंकाळी साडेपाचला प्रस्थान ठेवले. सोहळ्यावर वरुणराजाचा अभिषेक झाल्याने वारकरी आनंदले.इंद्रायणीतीरी जमलेले वैष्णव ‘चला पंढरीशी जाऊ, रखुमादेवीवरा पाहू,’ अशा संतवचनांची आठवण एकमेकांना करून देत होते. प्रवचन, भजन, हरिनाम गजराने भक्तिचैतन्य पसरले होते. पहाटे साडेचारला विश्वस्त सुनील दा. मोरे, सुनील दि. मोरे, अभिजित मोरे, जालिंदर मोरे यांच्या हस्ते, तर साडेपाचला विठ्ठल-रुख्मिणीची पूजा अशोक व सुनील मोरे यांच्या हस्ते, सहाला वैकुंठस्थान मंदिरात अध्यक्ष अध्यक्ष शांताराम मोरे, मनुशेठ वालेचा यांच्या हस्ते, सकाळी सातला तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधीची पूजा सुनील व अभिजित मोरे यांच्या हस्ते झाली.
तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान
By admin | Published: July 09, 2015 2:04 AM