मुंबई : राज्यात ज्या टोलनाक्यांवर अलिकडेच राज्य शासनाने हलक्या चारचाकी वाहनांना टोलमुक्ती देण्यात आली आहे तिथे आता स्कूलबसनाही टोलमुक्ती देण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबईच्या टोलचा निर्णय घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ही समिती येत्या एक महिन्यांत शासनाला अहवाल देईल. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले. ५३ नाक्यांवर स्कूलबसना टोलमुक्तीचा निर्णय आता झाला असल्याने स्कूलबस मालक पालकांना वेठीस धरणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. टोलमुक्ती देण्यात आलेल्या स्कूलबसना त्यांची नाक्यावर अडवणूक होऊ नये म्हणून पास दिले जातील, असे पाटील म्हणाले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर टोलमुक्ती दिली जाणार नाही, असे स्पष्ट करून ते म्हणाले की तिथे टोलमुक्तीची मागणीही कोणी केलेली नाही. या मार्गाचे रुंदीकरण आणि सुविधा वाढविण्याचा निर्णय शासनाने या आधीच घेतला आहे.
स्कूलबसना टोलमुक्ती
By admin | Published: June 17, 2015 2:52 AM