- ऑनलाइन लोकमत
भाविकांची गैरसोय : महाद्वारमार्गेच भाविकांना प्रवेश द्या
तुळजापूर, दि. 3 - श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सव कालावधीत भाविकांना घाटशीळमार्गे मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या विरोधात तुळजापुरातील व्यापारी, भाविकांसह सर्वपक्षीयांनी शनिवारी शहर बंदची हाक दिली होती. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये व्यापारी, पुजाऱ्यांसह किरकोळ दुकानदारांनीही सहभाग नोंदविला.
तुळजापूर शहर संघर्ष समितीच्या वतीने विविध आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात काळ्या फिती लावल्या होत्या. एवढेच नव्हे तर अनेक नागरिकांनी घराच्या दरवाजालाही काळे पडदे लावले होते. सकाळी शहरातील शिवाजी चौकातून मूकमोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, दीपक चौक, भवानी रोड, महाद्वार रोड, आर्य चौक, कमान वेस, मंगळवारपेठ मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोंचल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी येथे ठिय्या मांडला. त्यानंतर तहसीलदार काशिनाथ पाटील यांना तुळजापूर शहर मंदिर संघर्ष समितीच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव काळात राजेशहाजी व राजमाता जिजाऊ महाद्वारातून प्रवेश देण्याच्या मागणीचे लेखी निवेदन दिले. गतवर्षीही मार्गात बदल केल्यामुळे भाविकांसह इतर सर्वांनाच मानसिक व शारीरिक त्रास सोसावा लागला. या व्यवस्थेमुळे भक्तांसह शहरवासीयांना कुलधर्म-कुलाचार करणेही शक्य झाले नाही. रुढी-परंपरागत सुरू असलेल्या मार्ग बंद करून नवीन मार्ग सुरू केल्याने भाविकांचा गोंधळ उडाला होता. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी महाद्वारमार्गे भाविकांना प्रवेश देण्याची विनंती निवेदनात करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला.
मूकमोर्चात नगराध्यक्षा मंजुषाताई मगर, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, किशोर गंगणे, भाऊ भांजी, सज्जन साळुंखे, जीवनराव गोरे, नारायण गवळी, विनोद गंगणे, अविनाश गंगणे, नरसिंग बोधले, नारायण ननवरे, विपीन शिंदे, सचिन रसाळ, उत्तम अमृतराव, संदीप गंगणे, राजमाता भोसले, किशोर साठे, सुनील चव्हाण, गोकुळ शिंदे, अनिल काळे, महंत तुकोजी बुवा, शामलताई वडणे, मिलिंद रोकडे, संगीताताई कदम, गुलचंद व्यवहारे, महंत चिलोजीबुवा यांच्यासह व्यापारी, पुजारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने १७ महिला पोलीस, १२ पोलीस अधिकारी, १०० पुरुष पोलीस कर्मचारी असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
विधी-परंपरा पाळण्याची मागणी
शारदीय नवरात्रोत्सव २०१६ काळात परंपरागत मार्गाने श्री भवानी मातेच्या भक्तांना दर्शनास सोडावे, भवानी रोड ते महाद्वार ते कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, नारदमुनी मंदिर, गणपती मंदिर, होमकुंड या उपदेवतांचे दर्शन झाल्यानंतरच भवानीमातेचे दर्शन घेऊन विधी करण्याची परंपरा आहे. मात्र, प्रशासन धार्मिक विधी गांभीर्याने न घेता मनमानीपणे धार्मिक विधी विरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.