मुंबई : स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या गौरवाचा भाजपचा ठराव नियमात न बसल्याने अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी फेटाळला. त्यावर संतप्त विरोधकांनी पर्यायी विधानसभा भरवून ठराव मंजूर केला. तत्पूर्वी सभागृहात गदारोळ झाला. सत्तेसाठी शिवसेनेची लाचारी पाहवत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला ठराव नियमात नसल्यने अध्यक्षांनी फेटाळला. सावरकर याच्यांविषयी सर्वांना आदर आहे, कोणाचा विरोध नाही. विधानसभेत त्यांचे तैलचित्रही लावले आहे. चर्चा करायची तर ती सावरकर यांच्या वैज्ञानिक भूमिकेवरही करावी लागेल, असे पटोले म्हणाले. त्यामुळे भाजप सदस्यांनी गोंधळ सुरू केला. ‘हिंदुत्वाचे काय झाले, सावरकरांना हे विसरले’ अशा घोषणा देत त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले.देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, काँग्रेसच्या मुखपत्रात सावरकरांना बलात्कारी म्हटले जाते, माफीवीर म्हटले जाते हे आम्ही सहन करणार नाही, शिदोरीवर बंदी आणा. सावरकरांच्या गौरवाचा ठराव आणण्यास विरोध कशासाठी असा सवाल त्यांनी केला. सावरकरांचा स्मृतिदिन असताना त्यांच्याविषयी अवमानजनक काय छापून आले ते सांगणे योग्य नाही, असा टोला मंत्री जयंत पाटील यांनी हाणला.अजित पवार : सावरकरांविषयी आदरमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी सभागृहात नव्हते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सावरकर महान नेते, थोर देशभक्त होते, त्यांच्या देशसेवेविषयी आमच्या सर्वांच्याच मनात कृतज्ञता आहे. त्यांना भारतरत्न मिळावे म्हणून आपण मिळून प्रयत्न करू. सावरकरांविषयी मतेमतांतरे असू शकतात, गाय, बैलांबद्दलची त्यांची मते वेगळी होती ती सगळ्यांनाच पटली पाहिजेत असे नाही.
सावरकर गौरवाच्या ठरावावरून गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 5:18 AM