पुणे : कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहावे म्हणून महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी करण्यात आली. मात्र, आता काही वर्षांनंतर बहुतेक विभागांतील ही यंत्रणा बंद पडली आहे. त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे विभागप्रमुखांचे म्हणणे आहे. कर्मचारी मात्र त्यामुळे बिनधास्त झाले असून, पूर्वीप्रमाणेच कार्यालयात उशिरा येऊन मस्टरवर नंतर सह्या ठोकत आहेत.पालिकेत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे काही वर्षांपूर्वी बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली. ‘रात्री उशिरापर्यंत थांबावे लागले’, ‘साहेबांनी सकाळी येताना एक काम सांगितले होते’ अशी विविध कारणे उशिरा येण्यासाठी दिली जात होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवरच येणे भाग पडू लागले. तरीही उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेळेची नोंदणी थेट विभागप्रमुखांना मिळेल अशी व्यवस्था या यंत्रणेत करण्यात आली होती. त्यामुळे सतत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विभागप्रमुखाने त्यांच्या त्या-त्या दिवसांच्या रजा मांडण्यास सुरुवात केली. कायम उशिरा येणाऱ्यांच्या रजा त्यांना माहिती न पडता संपू लागल्या. काही जणांच्या रजा संपून त्यांना बिनपगारी रजा अशी नोंद होऊ लागली. असे होत आहे हे लक्षात आल्यानंतर मात्र कर्मचारी वेळेवर कार्यालयात येऊ व जाऊही लागले. त्यातून शिस्त लागली.मात्र आता बहुतेक विभागांमधील ही यंत्रणा बिघडली आहे. विभागप्रमुखांना उपस्थितीचा जो अहवाल मिळत होता, तो मिळणे बंद झाले आहे. त्यांना कर्मचाऱ्यांच्या हजेरी रजिस्टवरच्या सह्यांवरच विसंबून राहावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उशिरा येण्यास पुन्हा सुरूवात झाली आहे. विभागप्रमुखांनी याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे तक्रार केली. ही यंत्रणा बसविणाऱ्या कंपनीशी बोलून त्यातील बिघाड दुरुस्त करण्याची जबाबदारी या विभागावर आहे. मात्र, त्यांनी त्याची दखल घेतली नाही, असे विभागप्रमुखांचे म्हणणे आहे. रजिस्टर ताब्यात घेण्यास सुरुवातबायोमेट्रिक उपस्थितीचा अहवाल वरिष्ठांना मिळत नाही याची माहिती झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुन्हा उशिरा येणे सुरू केले आहे. उशिरा येऊन रजिस्टरवर सह्या ठोकल्या जातात. त्यामुळे आता विभागप्रमुखांनी कार्यालयीन वेळेनंतर रजिस्टर ताब्यात घेण्याची पूर्वीचीच पद्धत पुन्हा सुरूवात केली आहे. यापेक्षा बायोमेट्रिक यंत्रणा लवकर सुरू करावी, असे विभागप्रमुखांचे म्हणणे आहे.>ही यंत्रणा बसविण्याचे कोणत्या कंपनीने काम केले आहे याची माहिती घेऊ. विभागप्रमुखांकडूनही त्यांची यंत्रणा कधी बसविली, कधी नादुरुस्त याची माहिती मागवून घेऊ. यंत्रणा त्वरित दुरुस्त होऊन सुरळीत कार्यान्वित होईल, याची काळजी घेण्यात येईल.- सुहास मापारी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग (प्रभारी)
महापालिकेतील बायोमेट्रिक यंत्रणा बंद
By admin | Published: August 26, 2016 12:52 AM