औरंगाबाद : वैद्यनाथ कारखान्याबाबत कोणाच्याही तक्रारी नसताना, केवळ राजकीयदृष्ट्या मला अडचणीत आणण्याचा डाव काही लोक रचत आहेत, अशी खंत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी येथे व्यक्त केली.औरंगाबाद येथे आयोजित स्वयंसहायता महिला बचत गटांच्या वस्तूंचे विभागीय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे होते, तेव्हा या कारखान्याबद्दल तक्रारी नव्हत्या. आताही या कारखान्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी नाहीत. सभासदांच्या तक्रारी नाहीत. अपघातात ज्यांच्या घरचे लोक दगावलेत, त्यांच्याही तक्रारी नाहीत. अपघात हा दुर्दैवीच आहे. गेलेला माणूस आम्ही आणू शकत नाही. मात्र, आम्ही नुकसानभरपाई दिली. घरातील एकाला नोकरीमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. हजारो शेतकºयांचे भवितव्य या कारखान्यावर अवलंबून आहे. अशा प्रकारचे राजकारण करून कारखान्याची प्रतिमा मलिन करून ते काय साध्य करणार आहेत, असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला.साखरेचे भाव पडले, तर उसाचे देणेही अवघड होईल. यासाठी पंतप्रधानांची आम्ही भेट घेणार असून, मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व करावे, अशी आमची भूमिका आहे. या संदर्भात त्यांच्याशी चर्चाही झाली.मंत्रिमंडळातील पहिल्या पाच मंत्र्यात माझा समावेश आहे. महिलांच्या अस्मितेसाठी, आरोग्यासाठी काही केले नाही, तर माझ्या मंत्रिपदाला काहीही अर्थ राहणार नाही. खुर्चीला जपण्याचे निर्णय घेणे राज्यकर्ते जेव्हा बंद करतील, त्या दिवशी जनतेचे जीवन उंचावलेले असेल. त्यासाठी निर्णय घेण्याची तयारी असायला हवी, असे मतही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
मला अडचणीत आणण्याचा डाव - पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 6:01 AM