पनवेल : भिवंडी येथे रिक्षाचालकांनी केलेल्या मारहाणीत चालक प्रभाकर गायकवाड यांचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ एसटीच्या मुंबई विभागातील आगारात बंद पळण्यात आला. या बंदमध्ये पनवेल आगारातील कर्मचारीही सामील झाले होते. त्यामुळे सकाळी ८ वाजल्यापासून आगारातील फेऱ्या बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. भिवंडी आगारात एसटीचा रिक्षाला धक्का लागल्याने रिक्षाचालक व एसटीचालक प्रभाकर गायकवाड यांच्यात वाद झाला. या वेळी रिक्षाचालकाकडून करण्यात आलेल्या मारहाणीत गायकवाड यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर एसटी प्रशासनाने घेतलेली भूमिका कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याने त्यांनी शनिवारी बंद पाळून घटनेचा निषेध व्यक्त केला. पनवेल आगारातून एसटीच्या रोज ५७५ फेऱ्या होतात. शनिवारी दुपारी दीड वाजेपर्यंत एकही फेरी झाली नसल्याचे आगारप्रमुख परदेशी यांनी संगितले. दुपारी विभाग नियंत्रक संजय सुपेकर, व्हीव्ही यंत्र अभियंता मुकुंद बंडगर पनवेल येथे आले. त्यांनी चालक-वाहकांना प्रशासनाची भूमिका समजावून सांगितली. त्यानंतर श्रद्धांजली वाहून बंद मागे घेण्यात आला. बाहेरगावाहून येणाऱ्या बसगाड्याही पनवेल आगारात न आणताच बाहेरून नेण्यात येत होत्या. (प्रतिनिधी)प्रशासनाने कर्मचारी प्रतिनिधींना सोबत घेऊन पोलीस महासंचालकांना याबाबत निवेदन देण्याचे ठरवले आहे. दादर, वाशी या ठिकाणी एसटीचे खास पथक तैनात करण्यात येणार असून एसटी थांब्यावर अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.- संजय सुपेकर, विभाग नियंत्रक स्थानिक राजकीय नेते आणि संघटनांच्या बळावर रिक्षाचालक वा अन्य अवैध वाहतूकदार एसटीला लक्ष्य करतात. याप्रकरणी कारवाई होत नसल्याने घटनांत वाढ होत आहे. यावर कायमस्वरुपी उपाय योजना आखण्याची गरज आहे. - श्रीरंग बरगे, सरचिटणीस,महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनापरिवहन मंत्र्यांची भेट घेत अशा घटना घडू नयेत यासाठी कडक कायदा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यानूसार महामंडळाच्या महाव्यवस्थापकांची बैठक घेत अशा घटना घडणार नाही याची दखल घेण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले.- हिरेन रेडकर, सरचिटणीस,महाराष्ट्र एसटी कामगार सेना
पनवेलमध्ये एसटी बंद
By admin | Published: February 12, 2017 1:53 AM