जयंत धुळप,
अलिबाग- रायगड जिल्ह्यातील पहिली औद्योगिक नगरी असा इतिहास असलेल्या खोपोलीतील ४५ वर्षांची जुनी ‘झेनिथ स्कूल’ सध्या अडचणीत सापडली आहे. यामुळे ५८ मुलांचे भवितव्य अंधारमय होवून पालकवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. झेनिथ पाइप कंपनीने कारखान्यातील कामगारांच्या पाल्यांकरिता ही शाळा १९७१ मध्ये सुरू केली. केजी ते दहावीपर्यंतच्या या शाळेत प्रारंभीच्या ३५ वर्षांच्या काळात सुमारे ३०० ते ३५० विद्यार्थी शिक्षण घेत होते. २००९ पासून शाळेच्या संचालकांनी केजीचा पहिला वर्ग बंद केला. हळूहळू एक एक वर्ग बंद करत २०१५-१६ पर्यंत इयत्ता ५ वीपर्यंतचे वर्ग बंद केले. शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक अजित देशपांडे यांनी वेळोवेळी संचालक मंडळ व शिक्षण विभागाकडे शाळेच्या अडचणी, विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत कळवले आहे. परंतु संचालक मंडळाने या अडचणी व गैरसोयीकडे लक्ष दिले नाही. ही सारी परिस्थिती रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास कळवण्यात आल्यावर, पालक, शिक्षक प्रतिनिधी मुख्याध्यापक यांच्याबरोबर रायगड जिल्हा माध्यमिक शिक्षक विभागाने एक चौकशी समिती नेमून या समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. शाळेच्या संचालक मंडळास देखील चौकशी समितीने बोलावले, परंतु एकाही बैठकीस संचालक मंडळ उपस्थित राहिले नाही.शाळेत तीन शिक्षक व एक सेवक कायम आहेत. तर प्रतिवर्षी हंगामी स्वरूपात इतर शिक्षकांची नेमणूक करून शाळा चालवली जात आहे. मात्र शिक्षकांचे वेतनही वेळेत दिले जात नाहीत. शाळेची इमारत गळते, शाळेत कित्येकदा लाइट नाही, तर भिंती ओल्या झाल्यास कित्येक वेळा भिंतीला हात लागताच शॉक बसतो. आर्थिक कोणतीही मदत नसल्यामुळे स्वच्छतागृहाची व्यवस्था नीट नाही, पाण्याची सोय करणे शक्य नाही. शाळेचे मैदान म्हणजे गुरे चरण्यासाठी ठेवलेले गुरचरण म्हणावे लागेल. या सर्व गोष्टींची कल्पना मुख्याध्यापक देशपांडे यांनी शाळा चालविणाऱ्या झेनिथ कंपनीच्या शिक्षण समिती संचालकांना पत्राव्दारे, ई-मेलव्दारे, पोस्टाने, फोनवर देवूनही कोणताही प्रतिसाद संचालकांकडून दिला जात नाही. >आमदार व शिक्षण मंत्र्यांना पालक भेटणारसंस्थेला शाळा चालवण्याची इच्छा असेल तर शिक्षकांची नियुक्ती करून त्याच कंपनीच्या परिसरातील इतर योग्य इमारतीत शाळा चालणे व्यवस्थापनाला शक्यही आहे, ते त्यांनी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगून स्थानिक आमदार सुरेश लाड व राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे आता आम्ही तक्रार निवेदन देवून आमच्या पाल्याचे यंदा नुकसान करू नये अशी विनंती करीत असल्याचे सोनावणे यांनी सांगितले.>संचालक मंडळ गैरहजरविद्यार्थ्यांच्या भवितव्याचा व जीविताचा विचार करण्यास संचालक मंडळ तयार नाही. गेली दोन वर्षे मुख्याध्यापक याच अडचणी संचालकांना सांगत असताना, त्यांनी काहीही हालचाल केलेली नाही. १५ जूनला शाळा सुरू होणार आहे, अशावेळी विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्न, आर्थिक प्रश्न कसे सोडवणार, असा प्रश्न मुख्याध्यापक अजित देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. गेल्या ३ जून २०१६ रोजी शिक्षण विभागाचे संयुक्त पथक शाळेत पाहणी व चौकशीकरिता आले असता संचालक मंडळाचे कोणीही प्रतिनिधी उपस्थित राहिले नसल्याने पुढील निर्णय घेता येत नसल्याचे देशपांडे यांनी सांगितले. याबाबत झेनिथच्या शाळा समिती संचालक मंडळाचे अध्यक्ष पुष्कर नातू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.संचालक मंडळाचे पत्र : संचालक मंडळाने गेल्या ३० मे २०१६ रोजी शिक्षणाधिकारी (माध्य.) रायगड यांना पत्र पाठवून शाळा दुरुस्तीसाठी एक ते दोन वर्षे वेळ हवा आहे. विद्यार्थ्यांची इतर शाळेत शिक्षणाधिकाऱ्यांनी सोय करावी असे कळवले आहे. शाळा सुरु झाल्यावर आमच्या पाल्याची सोय कशी, कुठे करणार हा प्रश्न सर्व पालकांसमोर असल्याची माहिती पालक संघाचे प्रतिनिधी गोपीनाथ सोनावणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. शाळेच्या इमारतीची पाहणी करून अहवाल देण्याकरिता दोन अधिकाऱ्यांची समिती शाळेत पाठविली होती. त्यावेळी शाळा समिती संचालक मंडळाचे अध्यक्ष पुष्कर नातू व संचालक मंडळास देखील उपस्थित राहाण्याबाबत कळवले होते. परंतु ते उपस्थित राहिले नाही. संचालक मंडळानेच शाळेची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यांना शाळा बंदच करायची असेल तर त्यांनी एक वर्ष आधी पालकांना व शिक्षकांना सूचना देणे आवश्यक आहे. आयत्यावेळी शाळा बंद करण्याचा निर्णय घेता येणार नाही. अहवालाची पाहणी करून संचालक मंडळास योग्य ते आदेश देवून संबंधित अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येईल .- एस.एन.बढे, शिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद