Sambhaji Bhide And Tushar Gandhi: शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि देशाचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधाने केल्यावरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली आहे. यातच आता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली असून, संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करून अटक करावी, असे म्हटले आहे.
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये आले. संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल तक्रार दाखल केली. संभाजी भिंडे यांचा बोलविता धनी आरएसएस आणि नागपूर असल्याचा आरोप तुषार गांधी यांनी केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात एक आणि सभागृहाच्या बाहेर वेगळे बोलतात, असा आरोप तुषार गांधी यांनी केला.
आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे
संभाजी भिंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी आम्ही तक्रारीत केली आहे. संभाजी भिंडे यांनी आमच्या कुटुंबातील महिलांचा अपमान केला आहे. महात्मा गांधी आणि यांच्या आई आणि वडिलांवर त्यांनी टीका केली आहे. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. संभाजी भिडेवर कारवाई होईल, असा विश्वास तुषार गांधी यांनी केला.
दरम्यान, तुषार गांधी, विश्वंभर चौधरी, कुमार सप्तर्षी, मेधा पुरव सामंत, अन्वर राजन, संकेत मुनोत, युवराज शहा यांनी संभाजी भिडे आणि कार्यक्रम आयोजन करणाऱ्यावर आयोजकांवर तक्रार दाखल केली आहे. अब्रू नुकसान करणे, अपमान करणे, स्त्रीत्वाचा अपमान करणे, समाजामध्ये शत्रुत्व पसरवणे, गुन्हेगारी स्वरूपाचा खोडसाळपणा करणे, हे गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही केली असल्याचे वकील असीम सरोदे यांनी म्हटले आहे. पोलिसांनी चौकशी करून आम्ही गुन्हा नोंद करू असे आश्वासन दिल्याचे सरोदे यांनी सांगितले.