सातारा : वाई येथील घोटवडेकर रुग्णालयातील वॉर्डबॉय तुषार ऊर्फ सोनू रवींद्र जाधव (२५, रा. रविवार पेठ, वाई) याच्या खूनप्रकरणाला बुधवारी कलाटणी मिळाली. वाई हत्याकांडातील सिरीयल किलर संतोष पोळ यानेच तुषारला रुग्णवाहिकेत माझ्यासमक्ष इंजेक्शन दिले आणि त्यानंतरच त्याचा मृत्यू झाला, असा आरोप त्याच्या आईने बुधवारी केला. या प्रकरणाचा पुन्हा तपासाची मागणीही त्यांनी केली आहे. तुषार जाधव खून प्रकरणी चार दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने वेगळी दिशा दाखविणारे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पोलिसांनीही अत्यंत गांभीर्याने याचा तपास सुरू केला. दरम्यान, मृतदेहांच्या अंगावरील सोने काढून संतोषने ज्या सराफाकडे गहाण ठेवले होते, त्याच्याकडून तब्बल २७ तोळ्यांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. वाई येथील घोटवडेकर रुग्णालयात अतिदक्षता विभागात तुषार जाधव हा वार्डबॉय म्हणून काम करीत होता. संतोष पोळही याच विभागात काम करीत होता. या रुग्णालयात २५ मे २०१४ रोजी रुग्ण महिलेच्या छेडछाडप्रकरणी तुषारला पीडित महिलेच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली होती. त्यात तुषार गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर काही तासांच्या अवधीत त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूप्रकरणी राहुल विलास डेरे (३३), गणेश प्रकाश डेरे (२०), संदीप विष्णू डेरे (३६), सतीश रमेश डेरे (४०), प्रकाश तुकाराम डेरे (५७), सुधीर बाळकृष्ण सुतार (२२), विलास तुकाराम डेरे (६०, सर्व रा. कवठे, ता. वाई) यांच्यावर वाई पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान, मृत तुषारची आई नंदा रवींद्र जाधव यांनी बुधवारी वाई पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. या तक्रारीनुसार, ‘२५ मे २०१४ या दिवशी घोटवडेकर रुग्णालयात माझ्या मुलाला जमावाची मारहाण झाली. त्याची माहिती मिळताच मी रुग्णालयात गेले. त्या ठिकाणी त्याची हालचाल होत होती. संतोष पोळ याने त्याला रुग्णवाहिकेत घातले. मी देखील त्याच रुग्णवाहिकेत बसले. सातारपर्यंतच्या प्रवासात पोळ याने माझ्या समोरच तुषारला इंजेक्शन दिले आणि सातारपर्यंत पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला.’ (प्रतिनिधी) >२७ तोळे सोने जप्त ! : पोलिसांनी संतोष पोळ याला ‘खाक्या’ दाखवताच त्याने धर्मपुरी वाई येथील सोना ज्वेलर्समध्ये साडेआठ लाख रुपये किमतीचे २७ तोळे सोने गहाण ठेवल्याचे कबूल केले. त्यानंतर बुधवारी पोलिसांनी सोनू भंडारी यांच्या दुकानावर छापा मारून ऐवज हस्तगत केला. >वाई हत्याकांड हे अत्यंत संवेदनशील प्रकरण असून याबाबत कोणतेही मत प्रदर्शित करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांसह इतर घटकांनी जबाबदारीचे भान ठेवावे. - संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा
तुषार जाधव खूनप्रकरणाला कलाटणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2016 5:11 AM