- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असणारे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांची आॅर्थर रोड तुरुंगात शाही बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. तसे पत्रच त्यांनी तुरुंग विभागाचे महानिरीक्षक भूषणकुमार उपाध्याय यांना पाठविले आहे.छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ सध्या आॅर्थर रोड तुरुंगात असून, त्यांची विशेष बडदास्त ठेवली जात आहे. कारागृहातच मोठा टीव्ही बसविला आहे. त्यांना चमचमीत जेवण मिळते. तुरुंग कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिल्याचा दावा दमानिया यांनी केला. जानेवारीपासून हा प्रकार सुरू आहे. समीर भुजबळ रोज सकाळी तीन तास मोबाइलवर बोलतात. त्यासाठी मोबाइल जॅमरमध्ये छेडछाड केली आहे. त्यांना तुरुंगातच मद्य मिळते, असाही दमानिया यांचा आरोप आहे.- अंजली दमानिया यांची तक्रार मिळाली असून, पुढील कार्यवाहीसाठी तुरुंग विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. दमानिया यांनी यापूर्वी जे आरोप केले होते त्याबाबत याआधीच त्यांना वस्तुस्थिती सांगण्यात आली होती, असेही उपाध्याय यांनी स्पष्ट केले.