ठाणे : एकीकडे ज्येष्ठ नागरिकांची पोलिसांकडून नोंदणी केली जात असताना, दुसरीकडे चरईतील एका ज्येष्ठ नागरिकाला लुबाडल्याची घटना समोर आली आहे. या वेळी चोरट्याने टीव्ही दुरुस्तीचा बहाणा करून त्याच्या घरातून चार लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. चरईतील विनोद अपार्टमेंटमध्ये राहणारे लॉरेटा अॅलेक्स डेगो (६४) हे गुरुवारी रात्री घरात एकटेच होते. याचदरम्यान, त्यांच्याकडे आलेल्या एक अनोळखी व्यक्तीने तुमचा टीव्ही नादुरूस्त झाला आहे. मी दुरुस्ती करण्यास आल्याचे सांगून त्याने घरात प्रवेश केला. डेगो यांचे लक्ष विचलित करून त्याने कपाटातील ३ लाख ९८ हजारांचे दागिने चोरून नेले. शुक्रवारी सकाळी लॉरेटा यांना चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी नौपाडा पोलिसांत तक्रार दिली. (प्रतिनिधी)
टीव्ही दुरुस्ती करणे पडले चार लाखांना
By admin | Published: September 25, 2016 12:44 AM