मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथक आणि केरळ एटीएसने केलेल्या संयुक्त कारवाईत झाकीर नाईक याचा सहकारी अर्शिद कुरेशीला अटक केली. त्याच्या चौकशीत त्याने राज्यातील १२ जणांचे धर्मांतर केल्याची माहिती समोर येत आहे. धर्मांतर केलेल्या तरुण-तरुणींना तो इसिसकरिता लढण्यासाठी प्रवृत्त करीत होता. याबाबत एटीएसकडून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.केरळ राज्यात एका व्यक्तीने त्यांच्या नातेवाइकांना अर्शिद कुरेशी नावाच्या व्यक्तीने भूलपाथा देऊन, त्यांचे धर्मांतर केल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार केरळ एटीएसच्या तपासात कुरेशी मुंबईत राहत असल्याची माहिती समोर आली. त्याचप्रमाणे तो वादग्रस्त धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाउण्डेशनमध्ये देखील काम करीत असल्याचे समजले. त्यानुसार राज्य एटीएसच्या मदतीने केरळ एटीएसने नवी मुंबईतून कुरेशीला अटक केली. कुरेशी हासीवूड-दारावे येथील रहिवासी आहे. आतापर्यंत १२ जणांचे त्याने धर्मांतर केल्याचे समोर आल्याने हे धर्मांतर नेमके कोठे झाले आणि कोणाचे, याबाबत एटीएसने अधिक तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)>कल्याणमधून चौघे ताब्यात कल्याणमधून गुरुवारी एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असतानाच राज्य एटीएसने आणखीन तिघांना ताब्यात घेतले आहे. या चौघांकडेही कसून तपास सुरू आहे. हे चौघे कुणाच्या संपर्कात होते, याचा अधिक तपास सुरू असल्याचे एटीएसने सांगितले.
झाकीरच्या सहकाऱ्याने केले १२ जणांचे धर्मांतर
By admin | Published: July 23, 2016 4:35 AM