नवी मुंबई : नोकरनामापेक्षा जास्त महिला कामगार ठेवणाऱ्या व विनापरवाना डान्स सुरू असलेल्या बारवर गुन्हे शाखेने सोमवारी रात्री छापे टाकले. यावेळी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आलेल्या चार बारविरोधात गुन्हे दाखल करून संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. यावरून शहरात अद्याप डान्सबार सुरूच असल्याचे चित्र उघड झाले आहे.डान्सबारच्या परवान्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नसतानाही शहरात डान्सबार सुरू असल्याचे वृत्त गतमहिन्यात ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. उत्पादन शुल्क विभागासह काही पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे डान्सबार चालक असल्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे डान्सबार संबंधीच्या वृत्तानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी बदली प्रक्रियेत काही अधिकाऱ्यांवर मुख्य पदापासून दूर ठेवल्याचे पाहायला मिळाले. अशातच नवनियुक्त आयुक्त हेमंत नगराळे यांनी देखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उपायुक्त दिलीप सावंत, साहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी सोमवारी रात्री ठिकठिकाणी छापे टाकले. छाप्यांमध्ये अनेक बारमध्ये विनापरवाना रात्रीस चालणारे खेळ समोर आले. पनवेलमधील नाइट राइडर बारमध्ये विनापरवाना डान्सबार सुरू होता. तर वाशीतील संडे, मधुबन व सीबीडी येथील माया बारमध्ये महिला वेटर ग्राहकांसोबत अश्लील चाळे करीत असल्याचे आढळून आले. त्यानुसार चारही बारचे मॅनेजर, वेटर व बारबाला अशा ७४ जणांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकाच रात्रीत झालेल्या या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांना हाताशी धरून नियमांची पायमल्ली करणाऱ्या बारमालकांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)>डान्सबार संबंधीच्या वृत्तानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी बदली प्रक्रियेत काही अधिकाऱ्यांवर मुख्य पदापासून दूर ठेवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शहरात चर्चांना उत आला होता.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारवार छापे
By admin | Published: May 18, 2016 2:48 AM