मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या बारा आमदारांचे वर्षभराचे निलंबन रद्द ठरविल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या बारा आमदारांच्यावतीने आशिष शेलार यांनी विधिमंडळ सचिवांना पत्र पाठवत न्यायालयाच्या निकालाची माहिती दिली आहे. शिवाय, या निर्णयामुळे भाजपचे सर्व बारा आमदार विधिमंडळाचे विद्यमान सदस्य असून त्यांचा विधानभवनातील प्रवेश खुला झाल्याचे म्हटले आहे.
आशिष शेलार यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभेने भाजपच्या १२ आमदारांचे केलेले एक वर्षांचे निलंबन हे सर्वोच्च न्यायालयाने अवैध, घटनाबाह्य ठरवत रद्द केले. न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे सदर आमदारांना विधानभवनात प्रवेश खुला झाल्याकडेही शेलार यांनी सचिवांचे लक्ष वेधले आहे.
निलंबनाच्या विरोधात १२ आमदारांतर्फे शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निकाल २८ जानेवारीला दिला असून सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे निलंबन अवैध ठरवून रद्द केले आहे.
विधानभवन परिसरात पोलीस व्हॅन उभी करण्यात आल्याचे फोटो शेलार यांनी टि्वट केले आहे. अवैध, घटनाबाह्य, अतार्किक वागणाऱ्यांना आता कायदा पाळणाऱ्यांची भीती वाटतेय? विधानभवन परिसरात अहंकारी, हुकूमशाहीचे पिंजरे कशाला आणलेत? असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला आहे.