पिंपरी : बँक ऑफ महाराष्ट्रने गेल्या वर्षभरात बारा हजार कोटींहून अधिक कर्ज वितरण केले आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, किरकोळ कर्ज वितरणात अनुक्रमे २४ आणि ३४ टक्के वाढ झाली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव, कार्यकारी संचालक नागेश्वर राव यांच्या उपस्थितीत आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर करण्यात आला. सप्टेंबर २०१९च्या तुलनेत सप्टेंबर अखेरीस कर्ज वितरण १९,४०६ कोटी रुपयांवरून १ लाख ३ हजार ४०८ कोटी रुपयांवर पोहचले आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यात १३.१३ टक्के वाढ झाली आहे. किरकोळ कर्जामध्ये ३४.४२ आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम कर्जामध्ये २३.७५ टक्के वाढ झाली आहे.
बँकेचा एकूण व्यवसाय वाढला असून, निव्वळ नफ्यातही वाढ झाली आहे. बँकेतील चालू आणि बचत खात्यातील ठेवींच्या प्रमाणावर बँकेची स्थिती समजून येते. ती स्थिती अत्यंत चांगली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. बचत खात्यात ६६ हजार ८७० कोटी रुपयांच्या ठेवी असून, चालू खात्यात १३ हजार २५५ कोटी रुपये आहेत. त्याच बरोबर निव्वळ थकीत कर्जाचे प्रमाण सप्टेंबर २०१९ मध्ये ५.४८ टक्के होते. त्यात ३.३० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
---
- बँकेचा एकूण व्यवसाय २,६२,०३४ कोटी (१२.५३ %वाढ)
- एकूण कर्ज वितरण १,०३,४०८ कोटी (१३.१३%)
- एकूण ठेवी १,५८,६२६ कोटी (१२.१५%)
- निव्वळ नफा १३० कोटी (१३.४४%)