- विशेष प्रतिनिधी ।मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरेशा पावसाअभावी पिके करपण्याची शक्यता लक्षात घेता, कृषिपंपांना सध्याच्या ८ तासांऐवजी १२ तास वीजपुरवठा करण्यात येणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली.नाशिक, अहमदनगर, जळगाव, भुसावळ, उस्मानाबाद, भंडारा, धुळे या जिल्ह्यांसह अनेक महसूल मंडळांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असून, ९० टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. १९ तालुक्यांमध्ये पर्जन्यमान कमी झाल्यामुळे कृषिपंपांना १२ तास वीजपुरवठा करण्याची गरज आहे. ज्या तालुक्यांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. पावसाचा खंड ४ आठवड्यांपेक्षा अधिक असणा-या तालुक्यांमध्ये ८ ऐवजी १२ तास वीजपुरवठा करण्यात यावा. वीजपुरवठा करताना अधिक उपशामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, जमिनीतील पाण्याचा स्तर अधिक खाली जाऊ नये, याची काळजी घेण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
अपु-या पावसाच्या जिल्ह्यांत कृषिपंपांना बारा तास वीज - मंत्रिमंडळ निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:59 PM