कोल्हापूर : भाकपचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर झालेला भ्याड हल्ला निंदनीय आहे. हल्लेखोरांच्या तपासासाठी २० पोलीस पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, विविध दृष्टिकोनातून तपास सुरू आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अॅस्टर आधार हॉस्पिटल येथे भेट देऊन डॉक्टर व पानसरे यांच्या नातेवाइकांशी चर्चा केली. यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.मंत्री शिंदे म्हणाले, पानसरे दाम्पत्यावर झालेला भ्याड हल्ला निषेधार्थ आहे. गोविंद पानसरे यांची प्रकृती गंभीर, परंतु स्थिर आहे. त्यांच्यावरील काही शस्त्रक्रियांना यश आले आहे. अजून त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहेत. त्यांच्यासाठी आरोग्य सुविधांबाबत कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही. गरज पडल्यास बाहेरील डॉक्टर व एअर अॅम्ब्युलन्सही मागविली जाईल.पानसरे यांचे सामाजिक क्षेत्रातील महत्त्व पाहता हल्ल्याच्या तपासासाठी विशेष २० पथकांची नियुक्ती केली आहे. त्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व दहशतवादविरोधी विभागातील अधिकारी वर्ग करून तपासासाठी नियुक्त केले आहेत. घटनेची व्याप्ती व सखोल माहिती समोर येणे गरजेचे आहे. त्यासाठी संपूर्ण तपासावर विशेष पोलीस महानिरीक्षक निरीक्षण करतील. प्रथमदर्शनी दोन हल्लेखोर असल्याचे समोर आले आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाकडून तपास सुरू आहे. त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे, आवश्यकता वाटल्यास विशेष तपास यंत्रणेकडे (एसआयटी) तपास दिला जाईल.पुण्यातून पानसरेंना तुमचा दाभोलकर करू, अशी धमकीची पत्रे येत होती. याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, या शक्यतेसह विविध दृष्टिकोनातून तपास सुरू आहे. पुरोगामी नेत्यांवर हल्ले होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर इतर पुरोगामी नेत्यांना संरक्षण देणार का? यावर संंबंधितांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे संपर्क साधून संरक्षणाच्या मागणीचे पत्र प्रशासनास द्यावे, असे शिंदे यांनी सांगितले.यावेळी जिल्हाधिकारी राजाराम माने, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
तपासासाठी वीस पथके - गृहराज्यमंत्री शिंदे
By admin | Published: February 16, 2015 11:16 PM