ऑनलाइन लोकमतबीड, दि. 18 - सप्ताहाच्या सांगतेनिमित्त आयोजित केलेल्या महाप्रसादातून विषबाधा झाल्यामुळे अडीचशे पेक्षाही जास्त रूग्णांना उपचारासाठी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी आठ वाजता दाखल करण्यात असून यापैकी काही रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तालुक्यातील वांगी येथे ही घटना घडली. रात्री नऊ वाजता एका रूग्णाची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला आयसीयू मध्ये हालविण्यात आले आहे.वांगी गावात स्वामी निर्मळनाथ मंदिरात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवारी या सप्ताहाची सांगता होती. त्यानिमित्त गावकऱ्यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. वरण आणि चपाती असे जेवण गावकरी व पंचक्रोशीतून आलेल्या लोकांसाठी ठेवण्यात आले होते. दुपारी तीन वाजता जेवणासाठी पहिली पंगत बसली आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत जेवणाच्या पंगती सुरू होत्या. सुमारे दोन हजार लोकांसाठीचा स्वयपाक करण्यात आला होता. पहिल्या पंगतीत जेवण केलेल्या बाळू लक्ष्मण हाडोळे या तरूणाला तो जेवण करून घरी गेल्यानंतर दुपारी पाच वाजण्याच्या दरम्यान उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर हळू-हळू जेवण केलेल्या लोकांना उलटी, मळमळ, डोके दुखणे, चक्कर येणे, असे प्रकार होऊ लागले. जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांंनी या लोकांना तातडीने उपचारासाठी मिळेल त्या वाहनाने बीडला हलवण्याचे काम सुरू केले. ही संख्या तासाभरातच अडीचशेच्याही पुढे गेली.जिल्हा रूग्णालयात या सर्व रूग्णांवर उपचार सुरू असून वांगी गावातही डॉ. संदीप सांगळे यांच्या नेतृत्वाखाली एक डॉक्टरांची टीम पोहचली आहे. जिल्हा रूग्णालयात खासगी डॉक्टरांचे पथकही उपचार करण्यासाठी पोहोचले आहे.
सप्ताहाच्या पंगतीतील महाप्रसादातून अडीचशे जणांना विषबाधा
By admin | Published: August 18, 2016 11:28 PM