मुंबई - जुळ्या बहिणींसोबत लग्न केलेला तरूण चांगलाच अडचणीत सापडला आहे. २ डिसेंबरला सोलापूरच्या युवकाचं मुंबईतील जुळ्या बहिणींसोबत लग्न केले. या लग्नाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर आता या युवकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. इतकेच नाही तर राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत सोलापूर पोलीस अधीक्षकांना कारवाईचे आदेश दिलेत.
या जुळ्या बहिणी रिंकी आणि पिंकी दोन्ही आयटी इंजिनिअर आहेत. मुंबईत राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर दोघी आईसोबत राहत आहेत. २ डिसेंबरला दोन जुळ्या बहिणींनी एकाच युवकाशी लग्न केले. याबाबत अकलूजच्या पोलीस ठाण्यात युवकाविरोधात कलम ४९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा का दाखल झाला हे समजण्याआधी आपल्याला लग्नाबाबत कायदा काय आहे हे जाणून घ्यायला हवं.
विवाह कायदा काय सांगतो?
- आपल्या देशात लग्न-घटस्फोट यांच्याशी निगडीत विविध धर्मांचे वेगवेगळे कायदे आहेत. जसं हिंदू धर्मात हिंदू मॅरेज एक्ट, मुस्लिमांमध्ये मुस्लीम पर्सनल लॉ, हिंदूशिवाय शिख, जैन आणि बौद्ध धर्मांवर हिंदू मॅरेज एक्ट लागू आहे.
- १९५५ मध्ये हिंदू मॅरेज एक्टनुसार कलम ५ च्या तरतुदीनुसार लग्न वैध मानलं जाईल. पहिली तरतूद लग्नाच्या वेळी नवरा किंवा नवरी यांची आधीची पती किंवा पत्नी जिवंत नको. कोर्टाने पहिलं लग्न अमान्य(घटस्फोट) केल्यानंतर दुसरं लग्न करू शकतो.
- मुलाचे वय २१ आणि मुलीचे वय १८ पेक्षा जास्त असायला हवं. हिंदू मॅरेज एक्टनुसार लग्नासाठी नवरा आणि नवरी दोघांची परवानगी हवी. तर मुस्लीम मुलींना १५ वर्षानंतर लग्न करण्याचा अधिकार आहे.
- हिंदू धर्मात पहिला पती अथवा पत्नी जिवंत असताना दुसरं लग्न करू शकत नाही. दुसरं लग्न तेव्हाच होईल जेव्हा पती अथवा पत्नीचा मृत्यू होईल. किंवा ७ वर्षापर्यंत पती अथवा पत्नी वेगवेगळे राहत असतील. त्याचे जिवंत असण्याचे कुठले पुरावे नसतील अशावेळी दुसऱ्या लग्नास मान्यता आहे.
- हिंदूप्रमाणे ईसाई धर्मात दुसऱ्या लग्नास मान्यता नाही. ईसाईही दुसरं लग्न पहिल्या पती-पत्नीच्या मृत्यूनंतर करू शकतो. मात्र मुस्लिमांमध्ये पुरुषांना ४ लग्न करण्याची परवानगी आहे. मुस्लीम महिलांना दुसरं लग्न करण्यासाठी आधीच्या पतीपासून तलाक घेणे बंधनकारक आहे.
- त्याशिवाय एक स्पेशल मॅरेज एक्टही आहे. जो १९५४ मध्ये लागू झालाय. हा कायदा दोन वेगवेगळ्या धर्मातील वयस्कांना लग्न करण्याचा अधिकार देतो. स्पेशल मॅरेज एक्ट सर्वांवर लागू असतो. त्यासाठी लग्नाची नोंद करण्यास धर्म बदलण्याची गरज नाही.
- हिंदू मॅरेज एक्टनुसार पहिली पत्नी असताना दुसरं लग्न केल्यास ७ वर्ष जेल आणि दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.