नाशिक - नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी या मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी अर्ज न भरताच मुलासाठी माघार घेतली. तर सत्यजित तांबे यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. घडलेल्या प्रकारामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. त्यानंतर भाजपानेही या जागेवर कुणीही उमेदवार दिला नाही.
नाशिक पदवीधरची जागा कोण लढवणार यावर अद्यापही मविआत गोंधळ सुरू आहे. त्यात नाशिकमध्ये अपक्ष म्हणून फॉर्म भरलेल्या शुभांगी पाटील यांनी ठाकरेंची भेट घेत ठाकरेंचा पाठिंबा असल्याचं सांगितले होते. परंतु अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शुभांगी पाटील नॉट रिचेबल असल्याचं समोर आले आहे. तर महाविकास आघाडीचा पाठिंबा मलाच मिळेल. शुभांगी पाटील यांना अधिकृतपणे ठाकरे गटाचा पाठिंबा मिळाला नाही असा दावा नाशिकचे दुसरे अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांनी केला आहे. सुभाष जंगले यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जंगले हे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत.
नाशिक निवडणुकीत क्षणाक्षणाला उत्सुकता वाढत आहे. धनंजय जाधव यांनी या निवडणुकीत माघार घेतली आहे. भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन कालपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. शुभांगी पाटील यांचं मन वळवण्यात अद्याप त्यांना यश आले नाही. शुभांगी पाटील या भाजपाकडून निवडणूक लढवण्यात इच्छुक होत्या. परंतु भाजपानं उमेदवारीबाबत सस्पेन्स ठेवल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
अपक्ष उमेदवार धनराज विसपुतेंनी घेतली फडणवीसांची भेटधनराज विसपुते यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. १ तास आमची चर्चा झाली. या भेटीत विसपुतेंनी भाजपाकडे पाठिंबा मागितला परंतु पक्षाची भूमिका योग्य वेळी जाहीर करू असं आश्वासन फडणवीसांनी दिल्याची माहिती धनराज विसपुतेंनी दिली.
दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं या निवडणुकीला रंगत आली. सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांना काँग्रेसचं अधिकृत तिकीट मिळालं तरी त्यांनी अर्ज भरला नाही. सत्यजित तांबे यांनी भाजपाचा मला पाठिंबा मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारते हे पाहणे गरजेचे आहे.