Supriya Sule Eknath Shinde: महाराष्ट्रात शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी केली आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाले. महाविकास सरकारमध्ये घुसमट होत असल्याचे कारण देत एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांच्या साथीने वेगळी वाट धरली. त्यांना शिवसेनेतील आमदार, खासदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचाही पाठिंबा मिळाला. त्यामुळे शिंदे गटाने भाजपासोबत महाराष्ट्रात सत्तास्थापना केली. त्यानंतर वारंवार शिंदे गटातील आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीचे नेते शिवसेना संपवायला निघालेत असेही आरोप शिंदे गटाकडून करण्यात आले. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरला. त्यामुळे बराच वादंग निर्माण झाला आणि शिंदे गटावर सुळे समर्थक तटून पडले होते. पण आता 'कहानी में ट्वि्स्ट' पाहायला मिळत असून सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाच्या आमदाराचे तोंडभरून कौतुक केले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे. कोश्यारी यांच्यासोबतच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही महाराजांवर केलेल्या वक्तव्याचा विरोधकांकडून तीव्र विरोध केला जात आहे. राज्यपालांच्या या विधानावर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी इशारा दिला. 'छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान होत असेल तर हे चांगलं नाही. अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल आणि त्याचे दोघानांही परिणाम भोगावे लागतील,' असा इशारा संजय गायकवाड यांनी दिला. त्यावरूनच सुप्रिया सुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या अवमानकारक विधानाबाबत आमदार संजयजी गायकवाड यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करुच शकत नाही', असे ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी जाहीरपणे शिंदे गटातील आमदाराचे अभिनंदन आणि कौतुक केले.
काय म्हणाले होते भगतसिंह कोश्यारी?
'आमच्या शालेय जीवनात तुमचा आवडता हिरो कोण? आदर्श कोण ? असे विचारले तर कोणी सुभाष चंद्र बोस, कोणी नेहरू असे सांगत. पण आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण ? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. बाबासाहेब आंबडेकर ते डॉ. नितीन गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत,' असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले होते.