ठाणे : मोक्कांतर्गत तीन वर्षांपासून फरार असलेल्या दोन अट्टल घरफोड्यांच्या मुसक्या ठाणे पोलिसांनी आवळल्या. आरोपींविरुद्ध घरफोडीचे २३ गुन्हे दाखल असून घरफोडीच्या साहित्यासह जवळपास २.५ लाखांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.दहिसर येथील अन्वर हुसेन अब्दुल रशीद शेख (वय २७) आणि मूळचा कोलकाता येथील मोहम्मद अली मालिक शेख (वय २३) या दोन्ही अट्टल गुन्हेगारांच्या मागावर पोलिसांची यंत्रणा होती. दरम्यान, दहिसर येथील ठाकूरपाड्यातील एक दुकान फोडण्यासाठी ही दुककल येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, २७ जुलै रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास डायघर पोलिसांनी दोघांना अटक केली. दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर घरफोडीचे तब्बल २३ गुन्हे दाखल आहेत. आरोपींना मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या ठाण्यांच्या हद्दीतील घरफोडीच्या १३ गुन्ह्यांमध्ये यापूर्वी अटक करण्यात आली होती. शीळ-डायघर पोलीस ठाण्यातील दोन, मानपाडा पोलीस ठाण्यातील दोन आणि नौपाडा, खांदेश्वर तसेच रामनगर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक अशा सात घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय, माटुंगा पोलीस ठाण्यात सात, तर वांद्रे आणि सायन येथील प्रत्येकी एका गुन्ह्यात आरोपींचा शोध सुरू होता. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही आरोपींविरुद्ध सायन पोलीस ठाण्यात मोक्कान्वये गुन्हा दाखल असून या गंभीर गुन्ह्यामध्येही ते फरार होते.घरफोडीसाठी लागणारे सर्व साहित्य, २४ मोबाइल फोन, रबरी हातमोजे, मुखवटा, रेनकोट आणि मोटारसायकलसह २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला आहे. आरोपींकडून चोरीचा माल विकत घेणाºया वर्साेवा येथील निजाम प्रधान यालाही पोलिसांनी अटक केली. डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये आरोपींना अटक करण्यात आली असून तपासामध्ये आणखी काही गुन्हे उघडकीस येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
मोक्काचे दोन फरार आरोपी गजाआड, ठाण्यात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 3:53 AM