मुंबई : औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणात विशेष न्यायालयाने दोषी ठरवलेल्यांपैकी दोघांची उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली. या दोघांनीही विशेष न्यायालयाच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले असून आतापर्यंत त्यांनी जास्तीत जास्त शिक्षा भोगली आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज मंजूर केला.न्या. पी.एन. देशमुख यांनी जावेद अहमद व मुश्ताक अहमद या दोघांची प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली. विशेष न्यायालयाने या दोघांनाही आठ वर्षांची शिक्षा ठोठावली असून खटल्यादरम्यान या दोघांनीही सात वर्षांची शिक्षा भोगली आहे. खटल्याविरुद्ध या दोघांविरुद्ध केवळ दोन साक्षीदारांनी साक्ष दिली असून त्यातील एक सरकारी साक्षीदार नंतर फितूर झाला. खटला संपण्यापूर्वी या दोघांचीही जामिनावर सुटका करण्यात आली. जामिनावर असताना या दोघांनीही कोणत्याही अटीचे उल्लंघन केले नाही. त्यामुळे त्यांची जामिनावर सुटका करावी, असा युक्तिवाद दोघांच्याही वकिलांनी उच्च न्यायालयात केला. उच्च न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद स्वीकारून त्यांची जामिनावर सुटका केली. मात्र या दोघांनाही मालेगाव पोलीस स्टेशन व मुंबईतील काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये महिन्यातून एकदा हजेरी लावण्याची अट उच्च न्यायालयाने घातली.जुलै महिन्यात विशेष मकोका न्यायालयाने लष्कर- ए-तय्यबाचा सदस्य व २६/११ च्या दहशतवाद्यांना हिंदी शिकवणाऱ्या अबू जुंदालसह ११ जणांना २००६ सालच्या औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी शिक्षा ठोठावली. तर आठ जणांची सबळ पुराव्याअभावी सुटका केली. तसेच विशेष मकोका न्यायालयाने सरकारी वकील आरोपींवर मकोकाअंतर्गत ठेवण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यास अपयशी ठरले असे निरीक्षण नोंदवत सर्व आरोपींची मकोकातून सुटका केली. (प्रतिनिधी)
औरंगाबाद शस्त्रसाठ्याप्रकरणी दोन आरोपींची जामिनावर सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2016 2:19 AM