महाड : मागील आठवड्यात महाड तालुक्यातील तेलंगे मोहल्ल्यात झालेल्या घरफोडी प्रकरणातील दोघा आरोपींना मुद्देमालासह गजाआड करण्यात महाड ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. डीवायएसपी प्रांजली सोनावणे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दोन्ही आरोपी तेलंगे मोहल्ल्यातील रहिवासी असून, घरफोडी चोरीस गेलेल्या ५१ तोळे सोन्याच्या दागिन्यांपैकी ४६ तोळे सोने या आरोपीकडून हस्तगत करण्यात आल्याचेही सोनावणे यांनी सांगितले.८ मे ते १० मे च्या दरम्यान तेलंगे मोहल्ल्यातील रियाज गुलाम मुंढे आणि नसरुद्दीन मालीम झटाम यांच्या घरी घरफोडी होऊन सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा १४ लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून पलायन केले होते. मुंढे हे आपल्या आईच्या उपचारासाठी पुणे येथे दोन दिवसांसाठी गेले होते. त्या दरम्यान चोरांनी कपाटातील ५० तोळे सोन्याचे दागिने व रोख २५ हजार असा १४ लाखांचा ऐवज चोरून नेला. त्याच दिवशी नसरुद्दीत मालीम झटाम यांच्याही घरातील रोख रक्कम व तांब्याची भांडी असो ऐवज चोरून नेला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पो. नि. अरुण पाटील यांनी तपास करून दोन आरोपींना ४८ तासांत गजाआड केले. या घरफोडी प्रकरणी सलमान सिकंदर उमरे (२१) व अतहार अजिज खाजे (२२, रा. तेलंगे मोहल्ला) या दोघांना अटक करण्यात आली असून, आरोपी सलमान उमरे याची आई मुंढे यांच्या घरी घरकाम करते. तिच्याकडूनच मुंढे गावाला गेल्याची माहिती त्यांना मिळाली होती.
घरफोडीतील दोन आरोपींना अटक
By admin | Published: May 18, 2016 2:56 AM