इंदापूर : सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अंगावर शाई फेकप्रकरणी आणि घटनेची छायाचित्रे काढल्याप्रकरणी अटक केलेल्या दोघांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
पोलिसांनी शाई टाकणारा राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता सचिन मलगुंडे, दादा थोरात या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना ताब्यात घेतल्यापासून पोलिसांनी अज्ञात स्थळी ठेवले आहे. त्यांच्या नातेवाइकांना देखील त्यांना कोठे ठेवले याची माहिती नव्हती. दोन समाजात वाद वाढण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी गुप्तता पाळली आहे, असे सांगितले जात आहे.
धनगर समाजाच्या आरक्षण मुद्यावरून सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अंगावर शाई टाकण्यात आली. त्यांच्या डोळ्यात शाई गेली होती. त्यांचे स्वीय सहाय्यकांसह बंदोबस्ताला असलेल्या पोलिस अधिका:यांच्या अंगावर देखील शाई पडली होती. दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी सकाळीच न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली़ दरम्यान, या प्रकरणी पोलिसांवर राजकिय दबाव असल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे मासाळ यांनी केला आहे.