राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही. या राज्यात कायदा सुव्यवस्था नाही किंवा अघटित घडू शकेल का अशी चिंता आहे. फडणवीसांना कुणापासून धोका आहे. ते राज्याचे गृहमंत्री, नक्की कोणापासून सुरक्षा हवी, मुख्यमंत्र्यांपासून धोका आहे का...? अशी खोचक टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर आता, शिवसेना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे.
राऊतांच्या वक्तव्यावर भाष्य करताना सामंत म्हणाले, "विद्यमान मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना झेड सुरक्षा देण्यात यावी, असे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना (उद्धव ठाकरे) सांगितले गेले होते. त्यावेळी त्यांना ती नाकारलेली होती. म्हणजे, असे सांगितले जाते की, शंभूराज देसाई तेव्हा राज्यमंत्री होते आणि त्यांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी फोन करून सांगितले होते की, एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढविण्याची काही गरज नाही." एवढेच नाही तर, "याचा अर्थ तत्कालीन मुख्यमंत्र्यांना (उद्धव ठाकरे) एकनाथ शिंदे यांना दगा द्यायचा होता का? धोका द्यायचा होता का? असा प्रश्न निर्माण होतोना," असेही सामंत म्हणाले, ते टीव्ही९ सोबत बोलत होते.
"यामुळे मला असे वाटते की, जर सुरक्षिततेत वाढ झाली असेल आणि ती तत्काळ पुरवण्यात आली असेल, तर हे सरकारचे मोठेपण आहे. कारण शेवटी देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. एखादी व्यक्ती त्यांच्या जीवावर उठत असेल अथवा त्यांना धमकी देत असेल, तर त्यांची सुरक्षितता वाढवणे, ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणून त्यांच्या सुरक्षिततेत वाढ झाली आहे," असेही सामंत यांनी यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले होते राऊत? -
तत्पूर्वी, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ झाल्याचं कळालं, हे धक्कादायक आणि चिंतेची बाब आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना स्वत:ची सुरक्षा स्वत:चाच वाढवावी लागली. फोर्स वनचे जवान त्यांच्या घराला गराडा घालून बसलेत. हा काय प्रकार आहे..? राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही. या राज्यात कायदा सुव्यवस्था नाही किंवा अघटित घडू शकेल का अशी चिंता आहे. फडणवीसांना कुणापासून धोका आहे. ते राज्याचे गृहमंत्री, नक्की कोणापासून सुरक्षा हवी, मुख्यमंत्र्यांपासून धोका आहे का...भविष्यात मुख्यमंत्रिपदासाठी जो संघर्ष आहे तो पुढच्या १५ दिवसांत वाढणार आहे. फोर्स वन दहशतवाद्यांसोबत लढण्यासाठी स्थापन केला होता. त्या फोर्स वनचे जवान सुरक्षेत तैनात आहेत. फडणवीसांनी ज्यांना आश्वासने दिली ते हल्ला करणार आहेत, युक्रेन हल्ला करणार, रशिया करणार नेमकं काय झालंय? असा खोचक सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.