मुंबई : कोरोना विषाणू संक्रमणाशी मुंबई महापालिका करत असलेले दोन हात हे एक युद्धच आहे. या प्रयत्नांमध्ये सहकार्य करावे, अशी विनंती महापालिकेने मुंबईकरांना केली आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून विविध उपाययाेजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याला यश येत असून काेराेनाबाधितांची संख्या आता हळूहळू कमी होत आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्र उपाययोजनेची काटेकोर अंमलबजावणी, ब्रेक द चेन मोहिमेंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध याचा सकारात्मक परिणाम मुंबईमध्ये दिसत आहे.जानेवारी ते एप्रिल २०२१ या कालावधीमध्ये काेराेनामुळे मृत्यू झालेल्यांचे सरासरी प्रमाण ०.७१ टक्के इतके आहे. या कालावधीतील काेराेनात इतर झालेले मृत्यू एकत्र केले तरी हे प्रमाण ०.९८ टक्के इतके म्हणजेच १ टक्क्यांपेक्षा कमीच आहे. सद्य:स्थितीत जागतिक काेराेना मृत्यूचे प्रमाण २.११ टक्के इतके तर भारतात ते १.१२ टक्के इतके आहे. म्हणजेच, मुंबईतील काेराेनामुळे हाेणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे, अशी माहिती महापालिकेने दिली.
मिशन झीराे!संसर्ग टप्प्याटप्प्याने नियंत्रणात आणून ‘मिशन झीरो’ साध्य करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. त्यासाठी लसीकरणासह मास्क, सॅनिटायजर, सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले जात आहे.