ऑनलाइन लोकमत
धामणगाव बढे (बुलडाणा), दि. 18 - मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे पोलिस स्टेशन अंतर्गत येणा-या पोफळी येथे शेतीच्या जुन्या वादातून दोन सख्या भावाचा खून झाल्याची घटना १८ आॅक्टोबर रोजी दुपारी घडली असून, एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोफळी येथील सुनिल वसंत व्यवहारे, विनोद वसंत व्यवहारे तसेच दिलीप हनुमानसिंग राजपूत यांच्यामध्ये पोफळी शिवारातील शेतीचा जुना वाद न्यायालयात सुरू होता. दरम्यान सुनिल वसंत व्यवहारे व दिलीप वसंत व्यवहारे हे शेतीचा ताबा घेण्यासाठी शेतात गेले असता तेथे झालेल्या भांडणात या दोघा भावांची निर्घुण हत्या करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. धामणगाव बढे पोलिस स्टेशनचे ठाणेदार दीपक वळवी, त्यांचे सहकारी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख यांनी घटनास्थळ गाठले. सरकारी पंचासमक्ष व्हिडीओग्रॉफीमध्ये घटनास्थळाचा पंचनामा व जप्ती पंचनामा करण्यात आला. घटनास्थळी मोबाईल, शस्त्र हस्तगत करण्यात आले. विनोद वसंत व्यवहारे हे मलकापूर येथे व्यवसाय करत होते. तर त्यांचे बंधु सुनिल वसंत व्यवहारे पोफळी येथे शेती करत होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून दिलीपसिंग हनुमानसिंग राजपुत रा.पोफळी (वय ४० वर्षे) या आरोपीस ताब्यात घेतले असून यामध्ये आरोपींची
संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी दिली. घटनेचा तपास पोलिस उपविभागीय अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दीपक वळवी करत आहेत.
मृतकाचे शव विच्छेदन बुलडाणा येथे रवाना करण्यात आले. आरोपीच्या विरोधात कलम ३०२ (३४), ३२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.