- ऑनलाइन लोकमत
भोकर नदीपात्रातील अवैध वाळू उत्खननामुळे निर्माण झालेल्या डोहाने घेतले बळी
रावेर, दि. 2 - तालुक्यातील नांदुरखेडा येथील हातमजुरी करणाऱ्या गरीब कुटूंबातील सख्खे आते व मामेभाऊ असलेल्या दोन १६ व ११ वर्षीय मुलांचा पातोंडी शिवारातील भोकर नदीत पोहण्यासाठी गेले असता अवैध वाळू उत्खननामुळे निर्माण झालेल कृत्रिम डोहात बुडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना आज दुपारी १२. ३० वाजेदरम्यान घडली. रावेरच्या सरदार जी जी हायस्कूलच्या इ. ५ वी व इ १० वीतील ते दोघेही विद्यार्थी असल्याने शहरासह पातोंडी, नांदुरखेडा परिसरातून एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
नांदुरखेडा येथील प्रशांत राजाराम नायक (वय ११ वर्षे ) हा इ. ५ वी तील विद्यार्थी व त्याचा सख्खा आतेभाऊ जीवन रूपसिंग नायक (वय १६ वर्षे) हे दोन्ही आज सकाळी रावेरला शाळेत आले होते. मात्र शिक्षकांच्या संपामुळे शाळा बंद असल्याचे पाहून ते घरी परतले. दरम्यान, प्रशांतचे वडील राजाराम सायबू नायक हे त्यांचे आप्तेष्टांकडे खंडवा म. प्र. गेल्याने व त्याची आई शेतात गेल्याने त्याचे घरी केवळ धाकटा भाऊ होता. जीवनचे वडील रूपसिंग मांगीलाल नायक हे पत्नीसह शेतमजुरीसाठी गेल्याने त्याचे घरही बंद होते. म्हणून जीवन हा त्याचा धाकटा भाऊ रोहित, चुलतभाऊ प्रकाश अनार राठोड व मामेभाऊ प्रशांत यांच्यासह ३ कि. मी. अंतरावर असलेल्या पातोंडी येथे रावेर रस्त्यावर असलेल्या पुलाचे उत्तरेस सुमारे २०० मीटर लांब असलेल्या भोकर नदीतील डोहात पोहण्यासाठी गेले होते.
दरम्यान, प्रशांत व जीवन हे डोहात बुडाल्याचे पाहून प्रकाश व रोहित या भावंडांनी आरडाओरड करून मदतीसाठी हाक दिली. हाकेच्या अंतरावर असलेल्या अज्ञात वाळू कामगाराने घटनास्थळी धाव घेऊन डोहात उडी मारली . व मयत प्रशांत राजाराम नायक (वय ११ वर्षे) व त्याचा सख्खा आतेभाऊ जीवन रूपसिंग नायक (वय १६ वर्षे)यांचे मृतदेह बाहेर काढून पळ काढला. दरम्यान त्या भांबावलेल्या रोहित व प्रकाश या भावंडांनी थेट रावेर रस्त्यावरील पुलाकडे मदतीसाठी धाव घेतली. त्याठिकाणी रामेश्वर पौकपाल जाटप हे मोटारसायकल धूत असताना भेटल्यावर त्यांनी दुर्घटना सांगितली. रामेश्वर जाटप यांनी घटनास्थळी जाऊन पातोंडी व नांदुरखेडा गावात संपर्क साधून त्या कोवळ्या मुलांचे मृतदेह रावेर ग्रामीण रूग्णालयात हलवले. वैद्यकीय अधीक्षक डॉ बी बी बारेला यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, डॉ. बारेला यांनीच दोघांचे शवविच्छेदन केले. प्रभारी प्रांताधिकारी व रावेर तहसीलदार विजय ढगे व पोलीस निरीक्षक कैलास काळे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देवून घटनेची माहिती घेतली. नांदुरखेडा गावात एकाच वेळी एकाच गोरगरीब आप्तपरिवारातून सख्खे आते व मामेभाऊ असलेल्या मुलांची अंत्ययात्रा पाहून ग्रामस्थांचे व आप्तेष्टांकडे काळीज पिळवटून निघाले.