डोंबिवली : मानपाडा रस्त्यावरील भोपर-संदप येथे शनिवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत अल्ट्रा प्युअरकेम आणि जागृती केमिकल या कंपन्या भस्मसात झाल्या आगीत भस्मसात झालेल्या कंपन्यांशेजारीच एचपी गॅसचे गोदाम होते. मात्र, त्यातील सिलिंडर वेळीच बाहेर काढल्याने पुढील धोका टळला. सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली.अल्ट्रा प्युअरकेम कंपनीत सकाळी साडेआठच्या सुमारास आधी आग लागली. तेव्हा कंपनीत साधारण १२ कामगार होते. आग लागल्याचे दिसताच पळत बाहेर येत त्यांनी अग्निशमन दलाला कळवले. रसायनाची पिंपे फुटू लागल्याने पाहतापाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण कंपनीच आगीने वेढली गेली. पिंपांच्या स्फोटामुळे त्यातील काही ज्वलनशील भाग बाहेर पडल्याने शेजारच्या जागृती केमिकल कंपनीलाही काही क्षणातच आग लागली. ती कंपनी जळू लागताच त्यातील कामगारही जीव वाचवत बाहेर पळाले. उंचच उंच उठलेले धुराचे लोळ आणि स्फोट, ज्वाळा असेच भीषण दृश्य दीर्घकाळ होते. दोन कंपन्या धडाडून पेटल्याने परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे वाहतूककोंडी झाली. मदतकार्यात अडथळे आले. सध्याच्या टंचाईच्या काळात आग विझवण्यासाठी अतिरिक्त पाणी लागेल, हे गृहीत धरून पालिका कर्मचाऱ्यांनी १० ते १२ पाण्याचे टँकर मागवले होते. त्यातच, शनिवार असल्याने त्या भागातील पाणीपुरवठा बंद होता. परिणामी, अग्निशमन दलाच्या जवानांचीही पाण्यासाठी धावपळ सुरू होती. (प्रतिनिधी)१८ बंब घटनास्थळीआगीची माहिती मिळताच डोंबिवली अग्निशमन दल, महापालिका कर्मचारी, नागरी संरक्षण दलाचे जवान आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. कल्याण आणि डोंबिवलीतून अग्निशमन दलाचे पाच ते सहा बंब बोलावण्यात आले. पण आगीने रौद्र रूप धारण करताच अंबरनाथ, भिवंडी, उल्हासनगर येथील अग्निशमन दलाच्या बंबांना आणि नंतर ठाणे, नवी मुंबई, मुंबईच्या बंबांना पाचारण करण्यात आले. पण, रासायनिक कंपनीची आग असल्याने पाण्याचा फारसा उपयोग होत नव्हता. अग्निशमन दलाचे १८ बंब आणि पाण्याच्या सहा टँकरच्या साहाय्याने सुमारे १२५ कर्मचाऱ्यांनी सात तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. नंतरही बराच काळ ती धुमसत होती. आग लागलेल्या या दोन्ही कंपन्यांजवळच एचपी कंपनीचे गॅस सिलिंडरचे गोदाम आहे. ते सिलिंडरने पूर्ण भरलेले होते. त्यामुळे भीषण दुर्घटना घडू शकते, हे लक्षात येताच अग्निशमन दलाच्या जवानांनी जिवाची पर्वा न करता भरलेले १५६ सिलिंडर गोदामातून बाहेर काढून ट्रकमध्ये भरून स्थलांतरित केले. ही आग एवढी भीषण होती की, दूरवरूनही आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसत होते. आग पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी वाढल्याने कोंडी झाली. त्यातून कोणतीही दुर्घटना होऊ नये, म्हणून पोलिसांनी मानपाडा रोडवरील वाहतूक वळवली.अधिकाऱ्यांची धावआग लागल्याचे कळताच जागृती केमिकलचे मालक हितेश ठक्कर यांनी घटनास्थळी धाव घेत कामगार बाहेर पडल्याची खात्री केली आणि आग विझवण्यासाठी पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांना सहकार्य केले. या आगीत त्यांचे आॅफिस कसेबसे वाचले. पण, शेजारच्या गोदामातील रासायनिक पदार्थांचा साठा पूर्ण जळाला. त्यात त्यांचे लाखोंचे नुकसान झाले. अल्ट्रा प्युअरकेम कंपनीचे मालक मिथुन पाटील असून त्यांची संपूर्ण कंपनी जळून खाक झाली.आगीच्या ठिकाणी अप्पर पोलीस आयुक्त शरद शेलार, पालिका आयुक्त ई. रवींद्रन, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मानपाडा पोलीस ठाण्याचे प्रमुख गौतम रणदिवे, शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी, अतिरिक्त आयुक्त संजय घरत, सभागृह नेते राजेश मोरे, आपत्ती व्यवस्थापनप्रमुख अनिल लाड, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली.
डोंबिवलीतील भीषण आगीत दोन रासायनिक कंपन्या भस्मसात
By admin | Published: March 06, 2016 3:39 AM